मुंबईचा नयन चॅटर्जी कार्टिंग स्पीडस्टार
By admin | Published: August 22, 2016 12:24 AM2016-08-22T00:24:24+5:302016-08-22T00:24:24+5:30
राष्ट्रीय चॅम्पियनशिप : कोल्हापूरचा चित्तेश दुसरा, तर आकाश तृतीय स्थानी; ज्युनिअर गटात यश आराध्य, मायक्रो गटात अर्जुन नायर विजेते
कोल्हापूर : पावसाचा शिडकावा.. मध्येच सूर्यनारायणाचे दर्शन... प्रेक्षकांच्या जोरदार टाळ्या आणि प्रोत्साहन अशा उत्साही वातावरणात रंगलेल्या राष्ट्रीय कार्टिंग चॅम्पियनशिपमध्ये वरिष्ठ गटात मुंबईच्या नयन चॅटर्जीने चमकदार कामगिरी करीत बाजी मारली. ‘लोकलबॉय’ चित्तेश मंडोडीने अनपेक्षितपणे दुसरे स्थान काबीज करून कोल्हापूरकरांना जल्लोष करण्याची संधी दिली. याचबरोबर ज्युनिअर गटात यश आराध्य, तर मायक्रो गटात अर्जुन नायर विजेते ठरले.
कोल्हापूरजवळील हुपरी रोडवरील मोहितेज रेसिंग अकॅडमीच्या ट्रॅकवर १३ व्या जे. के. टायर-एफएमएसीआय राष्ट्रीय रोटेक्स मॅक्स चॅम्पियनशिपची रविवारी अंतिम फेरी पार पडली. या फेरीचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या तीन फेरीचा विजेता रिकी डॉनिसन. त्याला टक्कर देणारा कोल्हापूरचा ध्रुव मोहिते हे कारमध्ये झालेल्या बिघाडामुळे शर्यत पूर्ण करू शकले नाहीत.
सीनिअर गटात सहाव्या स्थानावरून सुरुवात करणाऱ्या नयन चॅटर्जीने पहिल्यापासूनच आघाडी घेतली. पाचव्या लॅपपर्यंत तो पुढे होता. त्यानंतर थोडा मागे पडला, पण त्याने लगेच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. शेवटी त्याने २० मिनिटे ३४.८४२ सेकंदाची वेळ नोंदवून पहिला क्रमांक मिळवला.
कोल्हापूरच्या ध्रुव मोहितेने थोड्या वेळासाठी आकाशला मागे टाकत आघाडी घेतली तेव्हा प्रेक्षकांनी जल्लोष केला. परंतु नयनने पुन्हा त्याला मागे टाकले. ध्रुव मागे पडू लागला. १२ व्या लॅपनंतर तो बाहेर पडला.
ध्रुवने निराशा केली असली तरी चित्तेश मंडोडीने कोल्हापूरकरांना जल्लोषाची संधी दिली. जवळजवळ दोन वर्षांनंतर ट्रॅकवर पुनरागमन करणाऱ्या चित्तेशने जबरदस्त कामगिरी करून दुसरे स्थान पटकावले. त्याने २० मिनिटे ४०.४९४ सेकंदाची वेळ नोंदवली. २० मिनिटे ४५.४०३ सेकंदाची वेळ नोंदवणारा आकाश गौडा तिसऱ्या स्थानावर राहिला.
ज्युनिअर मॅक्स गटात बंगलोरचे वर्चस्व राहिले. यश आराध्य याने पहिल्या क्रमांकावर कब्जा मिळवला. चिराग घोरपडे दुसऱ्या स्थानावर, तर पॉल फ्रान्सिस तिसऱ्या स्थानावर राहिला. या गटात आतापर्यंतच्या तिन्ही फेऱ्यातही आघाडी घेतलेल्या मानव शर्माला आजच्या चौथ्या फेरीत अपयश आले असले तरी त्याच्या एकूण गुणसंख्येत फरक पडलेला नाही. मायक्रो गटात आग्य्राचा शाहान अली आघाडीवर होता, परंतु पाऊस आल्यानंतर मात्र त्याचा वेग मंदावला. याचा फायदा घेत बंगलोरच्या अर्जुन नायरने पहिले स्थान मिळवले. या गटात बंगलोरचाच यश मोरे तिसऱ्या स्थानावर राहिला.
विजेत्यांना आण्णासाहेब मोहिते, शिवाजी आणि मोनिका मोहिते, अभिषेक आणि रिधिमा मोहिते यांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
रिकी दुसऱ्या स्थानावर घसरला
४या वर्षीच्या तिन्ही फेऱ्या जिंकणारा रिकी डॉनिसन हा या फेरीतही विजेतेपदाचा प्रबळ दावेदार समजला जात होता, पण रेसच्यावेळेस वरून पडणारा पाउस आणि त्यामुळे ओला झालेला ट्रॅक याचा त्याच्या कामगिरीवर परिणाम झाला.
४त्याच्या कारमध्ये बिघाड झाल्याने तो बाजूला झाला, काही वेळानंतर दुसऱ्या कारसह तो पुन्हा रेसमध्ये आला; परंतु तोपर्यंत संयोजकांनी त्याला अयोग्य घोषित केले होते. या फेरीत त्याला केवळ ३८ गुणांवर समाधान मानावे लागले. आता तो एकूण ३२४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.