मुंबईच्या प्रवाशाची दागिन्यांची बॅग लंपास, मध्यवर्ती बसस्थानकातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 11:43 AM2019-05-08T11:43:11+5:302019-05-08T11:44:41+5:30
मुंबईहून कोल्हापूरला येत असताना प्रवासी दाम्पत्याची ७५ हजारांचा ऐवज असलेली बॅग चोरट्याने लंपास केल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले. कपड्यांसह दोन तोळ्यांची सोन्याची चेन, अंगठी, लहान मुलांचे दागिने, आदी ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
कोल्हापूर : मुंबईहून कोल्हापूरला येत असताना प्रवासी दाम्पत्याची ७५ हजारांचा ऐवज असलेली बॅग चोरट्याने लंपास केल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले. कपड्यांसह दोन तोळ्यांची सोन्याची चेन, अंगठी, लहान मुलांचे दागिने, आदी ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
लोमेश बाळू आळवे हे पत्नी ज्योत्स्ना यांच्या नोकरीनिमित्त बांद्रे-मुंबई येथे वास्तव्यास आहेत. ते मूळचे गडहिंग्लज येथील रहिवासी आहेत. नातेवाइकाच्या लग्नासाठी ते मुंबईहून कोल्हापूरला येत होते. मंगळवारी कोल्हापूरच्या मध्यवर्ती बसस्थानकावर येताच त्यांनी बॅगेचा शोध घेतला असता त्यांना ती सापडली नाही. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला. चालक, वाहकांकडे चौकशी केली.
बॅग चोरीला गेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली. दागिन्यांची बॅग चोरीला गेल्याने दाम्पत्य हतबल झाले. सातारा किंवा कोल्हापूर बसस्थानकावर बॅग चोरीला गेल्याची पोलिसांना शंका आहे. सहायक निरीक्षक शहाजी निकम तपास करीत आहेत.
चार दिवसांत दुसरी घटना
मुंबईहून एरंडोळ (आजरा) गावी जाणाऱ्या एका महिला प्रवाशाची मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरात सात तोळे दागिने असणारी पर्स चोरट्याने लंपास केली होती. सुनीता संजय पाटील (वय ४०) यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ही घटना चार दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर लगेचच मुंबईच्या आणखी एका दाम्पत्याची बॅग चोरीला गेली. उन्हाळी सुटीमुळे बसस्थानकाच्या परिसरात पर्यटक, प्रवाशांची गर्दी होत आहे. शाहूपुरी पोलिसांनी २४ तास विशेष पथक या ठिकाणी गस्तीसाठी ठेवावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.