मनपाच्या पाणी टँकरला गळती
By Admin | Published: January 7, 2015 11:35 PM2015-01-07T23:35:44+5:302015-01-07T23:53:56+5:30
नासाडी : टँकरची दुरवस्था, डागडुजी आणि नूतनीकरणाची गरज
कोल्हापूर : शहरवासीयांसाठी उपसा करण्यात येणाऱ्या एकूण पाण्यापैकी ३० टक्के पाणी गळक्या पाईपमुळे गटारीत वाहून जाते तर घरगुती, व्यावसायिक तसेच क्रीडा कारणासाठी पाणीवहनाचे काम करणाऱ्या महापालिकेच्या टॅँकरला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. ‘पाणी वाचवा’चा संदेश देणाऱ्या प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी सुरू आहे.
महापालिकेकडून दररोज १२० ते १३० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याचा पंचगंगेतून उपसा केला जातो. मात्र, यातील २५ ते ३० टक्के पाणी पाईपलाईनच्या गळतीमुळे वाया जात असल्याचे चित्र आहे. वाया जाणाऱ्या पाण्याचा विचार केल्यास या पाण्याची किंमत महिन्याला एक कोटींपेक्षा जास्त भरते. परिणामी, वर्षाला साधारण १० ते १५ कोटी रुपयांची नासाडी गळक्या पाईपलाईनमुळे होत आहे. पाण्याची गळती, दुरुस्ती व त्यामुळे होणारे रस्त्यांचे नुकसान, असे मिळून किमान महिन्याला कोट्यवधी रुपये पाण्यात जात आहेत.
गळक्या पाईपलाईनवर सध्या तरी महापालिकेकडे दुरूस्त्या करण्याशिवाय उपाय नाही. एक गळती काढली की दुसऱ्या गळत्या स्वागताला तयार असतात. या गळत्यांमधून पाण्याची नासाडी कमी होते म्हणून की काय महापालिकेला गळणाऱ्या टँकरकडे पाहण्यास वेळ नाही. महापालिकेकडे असणारे सर्वच टॅँकर वयोमानानुसार जुने झाले आहेत. सततच्या वापरामुळे टॅँकरची टाकी गंजली आहे. तसेच त्यांचे आयुष्यमानदेखील संपत आले आहे. गळणाऱ्या टँकरमधून दररोज हजारो लिटर शुद्ध केलेले पाणी वाया जाते. पाण्याची नासाडी टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने टँकरच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. (प्रतिनिधी)
वाहनधारकांची कसरत
महापालिकेचे पाण्याचे टँकर मागणीनुसार शहरभर पाणी पुरविण्याचे काम करत असतात. कसबा बावडा जलशुद्धिकरण केंद्रातून टँकरमध्ये पाणी भरले जाते.
गळके टँकर रस्त्यावर पाण्याचा लोंढा सोडत जातात. त्यामुळे रस्त्यांवरही पाणीच पाणी होते.
धूळ व टँकरच्या पाण्यामुळे रस्ते निसरडे झाल्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.
अपव्ययाचा आकडा
दररोज उपसा १२० ते १३० दशलक्ष लिटर (एमएलडी)
सर्वप्रकारच्या गळतीमुळे दररोज २५ ते ३५ एमएलडी पाण्याची नासाडी
वर्षाला गळतीमुळे १० ते १५ कोटी रुपयांची नासाडी
दुरुस्तीच्या कामावर कोट्यवधी रुपयांचा खर्च