मुमताज शेख यांना पारितोषिक
By admin | Published: February 9, 2016 12:43 AM2016-02-09T00:43:03+5:302016-02-09T00:45:24+5:30
गुरुवारी होणार वितरण : पाटगावकर कुटुंबीयांतर्फे पुरस्कार
कोल्हापूर : महाराष्ट्रात महिलांसाठी वेगळ्या वाटेने जाऊन काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्तीस दिले जाणारे ‘कुसुम’ पारितोषिक यंदा ‘राईट टू पी’ चळवळ उभारणाऱ्या मुंबईतील मुमताज शेख यांना सोमवारी जाहीर झाले. पंचवीस हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.
गुरुवारी (दि. ११) शाहू स्मारक भवनात ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा होत आहे. अध्यक्षस्थानी बाबा मुळीक असतील. सायंकाळी पाच वाजता हा समारंभ होईल.
आंतरभारती शिक्षण मंडळ व दिवंगत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक चंद्रकांत पाटगावकर यांच्या कुटुंबीयांतर्फे हे पारितोषिक गतवर्षीपासून देण्यात येत आहे. पाटगावकर यांनी आंतरभारती शिक्षण मंडळाकडे तीन लाख रुपयांची ठेव मृत्यूपश्चात ठेवली आहे. त्याच्या व्याजातून हे पारितोषिक देण्यात येते. पाटगावकर यांची हयात राष्ट्रसेवा दलाची विचारसरणी रुजविण्यात गेली. सामाजिक समतेसाठी विविध विषयांवर त्यांनी शाळा, महाविद्यालयांत व्याख्याने दिली. त्यांच्या पत्नी कुसुम या प्राध्यापक होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर मिळालेली फॅमिली पेन्शन तीन लाख रुपये त्यांनी बाजूस ठेवली आणि
त्यातूनच हे कुसुम पारितोषिक दिले जाते.
मुमताज शेख यांचे काम वेगळ््या वाटेने जाणारे आहे. त्यांच्या कामाची सुरुवात महिलांतील साक्षरतेपासून झाली. दलित वस्तीतल्या महिलांना अक्षरांबरोबरच जगण्याचेही धडे त्या देऊ लागल्या. सध्या चेंबूर ट्रॉम्बे परिसरातील दहा हजार महिला फेडरेशनच्या माध्यमातून त्यांच्या चळवळीशी जोडल्या गेल्या आहेत. त्यातून अनेक दलित व मुस्लिम महिलांना आत्मसन्मानाचा मार्ग मिळत आहे. वस्तीतील वयात येणाऱ्या मुलींसाठीही त्यांनी खूप मोठे काम केले आहे.
‘राईट टू पी’ म्हणजे काय..?
‘राईट टू पी’ म्हणजे मूत्रविसर्जनाचा अधिकार. अनेकांना हे वाचून आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. कारण मूत्रविसर्जन ही स्वाभाविक क्रिया आहे. मग याचा अधिकार कसला असे वाटेल, पण आजही आपल्या देशात सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांना मूत्रविसर्जनासाठी शौचालयांची व्यवस्थाच नाही. स्वातंत्र्यानंतर महिला मोठ्या प्रमाणावर नोकरीसाठी घराबाहेर पडल्या आहेत; परंतु आजपर्यंत या नाजूक अडचणीबद्दल त्या संकोच बाजूला ठेवून बोलल्या नाहीत. हीच समस्या लक्षात घेऊन मुमताज यांनी ‘राईट टू पी’ही चळवळ सुरू केली.