मुंडे अपघात विम्याचा खातेदारासह कुटुंबातील एका व्यक्तीस लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 04:01 PM2020-06-13T16:01:42+5:302020-06-13T16:05:01+5:30
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून, खातेदार शेतकऱ्यासह त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीस लाभ होणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी दिली.
कोल्हापूर : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून, खातेदार शेतकऱ्यासह त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीस लाभ होणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी दिली.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही १० डिसेंबर २०१९ ते ९ डिसेंबर २०२० या कालावधीसाठी आहे. या योजनेमध्ये अपघाती मृत्यू झाल्यास अथवा दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख रुपये, तर एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळते. या योजनेचा विमा हप्ता शासनाने भरला आहे.
सरपंच, गावकामगार तलाठी, पोलीस पाटील यांनी आपल्या गावातील एखाद्या शेतकऱ्याचा अथवा त्याच्या कुटुंबातील सदस्याचा अपघाती मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास त्यांना या योजनेची माहिती द्यावी. त्याचबरोबर या योजनेच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी साहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.
दृष्टिक्षेपात योजना-
- योजनेचे नाव : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना.
- विमा हप्ता : शासन भरणार
- लाभ कोणाला : खातेदार शेतकरी व त्याच्या कुटुंबातील एक सदस्य (१० ते ७५ वयोगटातील)
- किती मिळणार भरपाई : व्यक्तीचा अपघाती मृत्यू अथवा दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख. एक अवयव निकामी झाल्यास एक लाख.