भरणा करण्याकरिता कोल्हापूर महापालिकेचे अॅप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 02:50 PM2019-12-25T14:50:35+5:302019-12-25T15:18:11+5:30
महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील नागरिकांना नागरी सुविधा केंद्राद्वारे अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून लवकरच विविध प्रकारचे कर भरण्याकरिता महापालिका प्रशासन नागरिकांकरिता स्वतंत्र अॅप तयार करणार आहे; त्यामुळे लवकरच घरबसल्या कराचा भरणा करणे शक्य होणार आहे.
कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील नागरिकांना नागरी सुविधा केंद्राद्वारे अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून लवकरच विविध प्रकारचे कर भरण्याकरिता महापालिका प्रशासन नागरिकांकरिता स्वतंत्र अॅप तयार करणार आहे; त्यामुळे लवकरच घरबसल्या कराचा भरणा करणे शक्य होणार आहे.
महानगरपालिकेच्या पाच नागरी सुविधा केंद्रामधून जन्म, मृत्यू प्रमाणपत्र, असेसमेंट उतारा नागरिकांना जलदगतीने मिळण्याबाबत मंगळवारी महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांनी महापौर कार्यालयात मुख्य लेखापाल, सिस्टीम मॅनेजर व संबंधित विभागाची आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीत ही माहिती देण्यात आली.
शहरातील नागरिकांकडून महानगरपालिकेस विविध कर भरणा करण्यात येतो. तो आॅनलाईन पद्धतीने त्यांना घरबसल्या भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे महापौर लाटकर यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
सी. एस. आर. फंडातून अॅक्सिस बँकेने मोफत अॅप तयार करून देण्याची तयारी दर्शविली आहे. सदरचे अॅप १३ ते २० दिवसांत तयार होणार असून, याचा लाभ नागरिकांना घरबसल्या घेता येणार असल्याचे मुख्य लेखापाल संजय सरनाईक यांनी सांगितले.
यावेळी महापौर लाटकर यांनी सर्वच नागरी सुविधा केंद्रांमध्ये जन्म, मृत्यू प्रमाणपत्र, असेसमेंट उतारा नागरिकांना कोणत्याही नागरी सुविधा केंद्रामध्ये त्वरित मिळण्यासाठी आवश्यक त्या सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.
या केंद्रामध्ये ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची व्यवस्था त्याचप्रमाणे असेसमेंट उतारादेखील आॅनलाईन पद्धतीने मिळण्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक ते बदल करून नागरिकांना देण्याच्या सूचनाही दिल्या. बैठकीस नगरसेवक सुभाष बुचडे, नगरसचिव दिवाकर कारंडे, सिस्टिम मॅनेजर यशपालसिंग राजपूत उपस्थित होते.