महापालिकेच्या इच्छुकांचे फलक प्रभागातून गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:21 AM2021-03-19T04:21:28+5:302021-03-19T04:21:28+5:30
महापालिकेची निवडणूक तोंडावर असल्याने डिसेंबरमध्येच अनेक इच्छुकांनी प्रभागात आपले फलक उभे करून त्याद्वारे जनेतला नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. जे ...
महापालिकेची निवडणूक तोंडावर असल्याने डिसेंबरमध्येच अनेक इच्छुकांनी प्रभागात आपले फलक उभे करून त्याद्वारे जनेतला नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. जे प्रभाग महिलांसाठी आरक्षित आहेत त्या ठिकाणी पतीराजांसह त्यांची छबी झळकवण्यात आली. मतदारसंघाच्या विकासासाठी मैदानात उतरणार असल्याचे फलकांच्या माध्यमातून जनतेच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न सुरू झाला.
चैत्रातील हळदी कुंकवाला तर बहर आला. वाण लुटलं गेलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी शिबिरांची संख्या वाढू लागली. नेत्यांचे फोटो लावून ही शिबिरे झाली. काँग्रेसचे पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या सत्तेत असणाऱ्या नेत्यांचे फोटो फलकावर लावून तिकीट मिळवण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या.
एवढ्यावरच न थांबता विद्यमान नगरसेवकांनी आपल्या पाच वर्षांच्या कालावधीत प्रभागात किती कोटींची कामे झाली याची आकर्षक मांडणी करणारे प्रचारपत्रे घरोघरी पोहोच केली. जी शिल्लक कामे होती ती रात्रीतून पूर्ण केली गेली. रात्री उशिरापर्यंत गाठीभेटी सुरू झाल्या. बैठकांना ऊत आला. प्रभागातील राजकीय चाणक्य कामाला लागले. वेगवेगळ्या पद्धतीने सर्वेक्षण सुरू झाले; परंतु या सगळ्यामध्ये निवडणुकाच पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आणि अनेकांचा हिरमोड झाला.
महापालिका निवडणुकीला उभारणार म्हटले की, नागरिकांच्या अपेक्षा वाढत असल्याने अनेकांनी मग फलक उतरवायला सुरुवात केली. कारण आता कुणी काही मागायला आले तर नाही म्हणायचे कसे हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. तरुण मंडळांचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, गटातील कार्यकर्ते यांच्या मागण्यांचा विचार करता अनेक इच्छुकांनी आतापासूनच खर्च नको, अशी सावध भूमिका घेतली आहे.
चौकट
एका रात्रीत रस्ता चकाचक
गेल्या महिन्याभरात कोल्हापूर शहरात रस्त्यांच्या डांबरीकरणाला ऊत आला आहे. जी कामे मंजूर करून ठेवली होती ती निवडणुकीच्या आधीच महिनाभर करण्याचे नियोजन करण्यात आल्याने अनेक प्रभागांमध्ये रात्रीतून रस्त्यांचे भाग्य उजळले. नागरिक रात्री घरात झोपायला गेले आणि सकाळी उठल्यानंतर आपल्या गल्लीतील रस्ता डांबरी झाल्याचे अनेकांना पहावयास मिळाले.