corona virus :महापालिकेच्या अधिकाऱ्याला आयुक्तांनी दिला दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 06:39 PM2020-07-06T18:39:13+5:302020-07-06T18:40:37+5:30
अत्यंत शिस्तप्रिय असणारे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या नजरेतून महापालिकेचे अधिकारीही सुटलेले नाहीत. याचीच प्रचिती सोमवारी सकाळी पुन्हा एकदा आली. आस्थापना अधीक्षक सागर कांबळे महापालिका परिसरातून विनामास्क जात होते. यावेळी आयुक्तांच्या हे निदर्शनास आले. त्यांनी कांबळे यांना जाब विचारत पाचशे रुपयांचा दंड केला.
कोल्हापूर : अत्यंत शिस्तप्रिय असणारे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या नजरेतून महापालिकेचे अधिकारीही सुटलेले नाहीत. याचीच प्रचिती सोमवारी सकाळी पुन्हा एकदा आली. आस्थापना अधीक्षक सागर कांबळे महापालिका परिसरातून विनामास्क जात होते. यावेळी आयुक्तांच्या हे निदर्शनास आले. त्यांनी कांबळे यांना जाब विचारत पाचशे रुपयांचा दंड केला.
कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदी रुजू झाल्यापासून डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी कामातून वेगळा ठसा उमटविला आहे. दर रविवारी होणाऱ्या स्वच्छता मोहिमेमुळे ते राज्यात स्वच्छतादूत म्हणून परिचित झाले आहेत. शहर स्वच्छ, प्लास्टिक मुक्त, प्रदूषणमुक्त राहावे असा त्यांचा नेहमी अट्टहास असतो.
एखाद्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गेल्यानंतर प्लास्टिकचा वापर करीत असल्याचे आढळून आल्यास कार्यक्रमाला आमंत्रण देणाऱ्या संयोजकालाच त्यांनी थेट दंड लावल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यांच्या या कारवाईतून महापालिकेचे कर्मचारी, अधिकारीही सुटलेले नाहीत. मंगेशकरनगरात स्वच्चता मोहीम आटोपून एका अधिकाऱ्याच्या घरी चहा पिण्यासाठी गेल्यानंतर दारात कचरा जाळल्याप्रकरणी त्यांच्या हातावर पाचशे रुपयांची पावती ठेवली. असे अनेक घटना घडल्या.
सोमवारी पुन्हा एकदा त्यांच्या शिस्तीची प्रचिती आली. अस्थापना अधीक्षक सागर कांबळे विनामास्क फिरत असल्यावरून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावरही कारवाई केली. शहरात सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करीत नसणारे, मास्क, हँडग्लोज न वापरणाऱ्यांवर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई सुरू आहे. नागरिकांवर जर दंडात्मक कारवाई करीत असेल तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वेगळा नियम नाही, असा संदेशच त्यांनी या कारवाईतून दिला आहे.