महानगरपालिका आरक्षण जाहीर; ३९ जागा खुल्या, ४० ठिकाणी महिलांना संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 12:13 PM2022-06-01T12:13:18+5:302022-06-01T13:00:10+5:30
महानगरपालिका प्रशासनाने निवडणुकीची प्रक्रिया सुरू केल्यानंतरही ही निवडणूक ऑक्टोबरनंतरच होईल, असा दावा करण्यात येत आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी महानगरपालिका प्रशासनाने मंगळवारी प्रभागावरील अनुसूचित जाती, अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती, सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला अशी आरक्षणे सोडत पद्धतीने निश्चित केली. त्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी सहा, अनुसूचित जाती महिला प्रवर्ग सहा, अनुसूचित जमाती एक, सर्वसाधारण महिला ४० तर सर्वसाधारण ३९ प्रभागांचा समावेश आहे. नव्या सभागृहात ९२ नगरसेवकांपैकी ४६ पुरुष तर ४६ महिला नगरसेवक असतील.
ना शिट्ट्या, ना जल्लोष, ना गडबड ना गोंधळ, ना हुरहूर, ना अस्वस्थता अशा शांततापूर्ण वातावरणात मंगळवारी कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. आरक्षण सोडतीवेळी इच्छुक उमेदवार, त्यांचे समर्थक, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांत आरक्षणाबाबत कमालीचा निरुत्साह पाहायला मिळाला. पालिका निवडणुकीच्या आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच असे घडले. निवडणूक पावसाळ्यात होईल की दिवाळीनंतर होईल, ओबीसींचे आरक्षण न्यायालयातून मिळणार की नाही, जर आरक्षण मिळाले तर पुन्हा आरक्षण सोडत होणार का, अशा अनेक टप्प्यांवर इच्छुक उमेदवार, त्यांचे समर्थक, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता यांच्यात संभ्रम अजूनही कायम आहे.
महानगरपालिका प्रशासनाने निवडणुकीची प्रक्रिया सुरू केल्यानंतरही ही निवडणूक ऑक्टोबरनंतरच होईल, असा दावा करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मंगळवारी या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला. ओबीसी आरक्षणाशिवाय काढलेल्या आरक्षण सोडतीवेळी नेहमीची उत्सुकता, हुरहूर दिसली नाही. प्रशासनाने मात्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे औपचारिकता पार पाडली.
असे असेल आरक्षण
- नव्या सभागृहात ९२ नगरसेवक
- ४६ पुरुष तर ४६ महिला नगरसेवक
- हे ९२ नगरसेवक त्रिसदस्यीय रचना असलेल्या ३१ प्रभागातून निवडून येणार.
- अनुसूचित जाती प्रवर्गासाठी-०६
- अनुसूचित जाती महिला प्रवर्ग -०६
- अनुसूचित जमाती -०१
- सर्वसाधारण महिला -४०
- सर्वसाधारण : ३९
नाट्यगृह मोकळे; आठच महिलांची उपस्थिती
महानगरपालिकेच्या सभागृहात जाऊ इच्छिणाऱ्या भावी नगरसेवकांनी आरक्षण सोडतीकडे पाठ फिरविल्यामुळे नाट्यगृह मोकळे पडले होते. नागरिकांपेक्षा कर्मचारी, पोलीस, पत्रकार यांचीच संख्या सर्वाधिक होती. ज्या सभागृहात पुरुषांच्या बरोबरीने महिलांना जाण्याची संधी मिळणार आहेत, त्या महिलांपैकी केवळ आठ महिलाच आरक्षण सोडतीला उपस्थित होत्या.
अनुसूचित जाती महिलांपासून सुरुवात
सर्वप्रथम अनुसूचित जातीसाठी लोकसंख्येच्या निकषावर आधारित आधीच आरक्षित केलेल्या बारा जागांतून सहा जागा या अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी सोडतीद्वारे निश्चित करण्यात आल्या. त्यामध्ये प्रभाग क्रमांक ७ अ, प्रभाग क्रमांक ४ अ, प्रभाग क्रमांक ९ अ, प्रभाग क्रमांक १३ अ, प्रभाग क्रमांक २८ अ व प्रभाग क्रमांक ३० अ यांचा समावेश आहे. त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी निश्चित केलेल्या प्रभागावर महिला की पुरुष हे निश्चित करण्यात आले. प्रभाग क्रमांक २ अ यावर अनुसूचित जमाती पुरुष असे आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले.
३१ प्रभागांत सर्वसाधारण महिलांना थेट आरक्षण
सर्वसाधारण महिलांसाठी ४० जागा आरक्षित करायच्या होत्या. त्यामुळे किमान दोन बिनआरक्षित असलेल्या ३१ प्रभागांवर महिलांना थेट आरक्षण देण्यात आले. त्यानंतरही बिनआरक्षित असलेल्या १७ प्रभागांतून नऊ सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण सोडत पद्धतीने टाकण्यात आले. अनुसूचित जाती, जमाती, सर्वसाधारण महिला यांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर राहिलेले ३९ प्रभाग हे सर्वसाधारण म्हणून जाहीर करण्यात आले.
१७ प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले
आरक्षण सोडतीत शहरातील ३१ प्रभागांपैकी १७ प्रभाग केवळ सर्वसाधारण (महिला/ पुरुष) प्रवर्गासाठी झाले आहेत. या प्रभागात अन्य कोणत्याही प्रवर्गाचे आरक्षण पडलेले नाही. नऊ प्रभागांतील प्रत्येकी दोन जागांवर महिलांसाठी तर आठ प्रभागांत प्रत्येकी दोन जागांवर पुरुषांसाठी आरक्षण आहे. ओबीसी आरक्षण नसल्यामुळे या प्रवर्गाच्या उमेदवारांना सर्वसाधारण प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार आहे.
ओबीसी आरक्षण वगळले
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण नाकारले असल्याने मंगळवारच्या सोडतीतून ओबीसी प्रवर्ग वगळण्यात आला. पूर्वी ओबीसींना २७ टक्के आरक्षण दिले होते. या हिशोबाप्रमाणे किमान २५ प्रभागांतील एक जागेवर ओबीसींना आरक्षण मिळाले असते. मात्र, आता त्यांना आरक्षण वगळण्यात आल्यामुळे या जागा खुल्या प्रवर्गाकडे गेल्या आहेत. त्यामुळे खुल्या प्रवर्गातून आनंद तर ओबीसीमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
विद्यार्थ्यांनी काढल्या चिठ्ठ्या
महापालिकेच्या लक्ष्मीबाई कृष्णाची जरग विद्यामंदिरमधील शिशैल्य चाळके, निनाद कांबळे, आर्यशीष पाटील, नक्षत्रा बन्ने व स्नेहा गराडे या विद्यार्थ्यांनी आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढल्या. ड्रममधील चिठ्ठी उचलून हे विद्यार्थी प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्या हातात देत होत्या आणि बलकवडे या त्या जाहीर करत होत्या.
शिस्तबद्ध व नेटके नियोजन
केशवराव भोसले नाट्यगृहात पार पडलेल्या आरक्षण सोडतीचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध व नेटकेपणाने केले होते. प्रशासक कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसूळ, सहायक आयुक्त विनायक औंधकर, लेखापाल संजय सरनाईक आदी अधिकारी या प्रक्रियेत सहभागी झाली होती. नाट्यगृहात तसेच नाट्यगृहाबाहेर अग्निशमन दलाचे जवान तसेच पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्त होता.