‘अनिकेत’च्या कामगिरीचा महापालिकेला विसर-: युवा फुटबॉलपटू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 01:09 AM2018-03-22T01:09:07+5:302018-03-22T01:09:07+5:30
कोल्हापूर : एरव्ही राज्यस्तरीय,राष्ट्रीय शालेय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंचा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आमंत्रित करून गौरव केला जातो.
सचिन भोसले ।
कोल्हापूर : एरव्ही राज्यस्तरीय,राष्ट्रीय शालेय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंचा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आमंत्रित करून गौरव केला जातो. मात्र, युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा खेळलेला महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू अनिकेत जाधवचा विसर पडला आहे. याबद्दल क्रीडा क्षेत्रातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
कोल्हापूरच्या कोणत्याही खेळाडूने कुस्ती, क्रिकेट, कबड्डी, खो-खो, धावणे, फुटबॉल आदी क्षेत्रांत राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत धवल कामगिरी केली तर त्याला आणखी चांगली कामगिरी करण्याकरिता प्रोत्साहन म्हणून महापौरांच्या हस्ते सर्वसाधारण सभेत गौरव करण्याची प्रथा आहे. मात्र, गेल्या वर्षभरात कोल्हापूरच्या युवा फुटबॉलपटू ‘अनिकेत’च्या अतुलनीय कामगिरीचा विसर पडला आहे. सांस्कृतिक नगरीबरोबरच क्रीडानगरी म्हणून देशभर सर्वश्रूत असलेल्या या करवीरनगरीने आतापर्यंत अनेक खेळाडू देशाला दिले आहेत.
यात कुस्तीगीर कै. खाशाबा जाधव, कै. युवराज पाटील, हिंदकेसरी व अर्जुन पुरस्कार विजेते गणपतराव आंदळकर, महान भारत केसरी दादू चौगुले, हिंदकेसरी विनोद चौगुले, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू अर्जुनवीर शैलजा साळुंखे, नेमबाज तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, राधिका बराले, जलतरणपटू वीरधवल खाडे, मंदार दिवसे, आदी दिग्गजांचा समावेश आहे. त्यात आॅक्टोबर २०१७ ला भारतात झालेल्या युवा विश्वचषक फुटबॉल खेळलेला कोल्हापूर व महाराष्ट्राचा एकमेव फुटबॉलपटू म्हणून अनिकेतचा समावेश होता. त्याच्या कामगिरीची दखल घेत राज्य शासनातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा लाख रुपये बक्षीस रूपात जाहीर केले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाबरोबर त्याचाही ‘विशेष निमंत्रित’ करून गौरव केला आहे.
या सर्व सत्कारांबरोबर घरचा सत्कारही तितकाच महत्त्वाचा असतो. त्यामुळे त्याच्या सत्काराचा विसर पडणे म्हणजे कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेला बाजूला ठेवण्यासारखे काम आहे. त्यामुळे महापालिका पदाधिकाऱ्यांनी त्याचा यथोचित गौरव करणे अपेक्षित आहे.
सदस्य खेळाडूंनाही विसर
महापालिकेच्या लोकप्रतिनिधींमध्ये माजी राष्ट्रीय फुटबॉलपटू संभाजी जाधव, सचिन पाटील, संतोष गायकवाड, विजयसिंह खाडे हे चार फुटबॉलपटू नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यात विशेष म्हणजे महापौर स्वाती यवलुजे याही राष्ट्रीय हॉकीपटू व संघटक सागर यवलुजे यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे अनिकेतच्या कार्याचा विसर कसा पडला याबद्दल क्रीडारसिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.