महापालिकेने गाठला एक लाख लसीकरणाचा टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:24 AM2021-04-15T04:24:18+5:302021-04-15T04:24:18+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात सुरू असलेल्या लसीकरणाच्या मोहिमेत कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने बुधवारी एक लाख लसीकरणाचा टप्पा गाठला. दि.१६ जानेवारीपासून ...
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात सुरू असलेल्या लसीकरणाच्या मोहिमेत कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने बुधवारी एक लाख लसीकरणाचा टप्पा गाठला. दि.१६ जानेवारीपासून ही मोहीम सुरू असून आता लस संपल्यामुळे केवळ आज, गुरुवारी लसीकरण सुरू राहणार आहे.
शहरातील लसीकरणाची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. शहरात एकूण तेरा केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. सर्व यंत्रणा अतिशय वेगाने काम करत आहे; परंतु तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत लसीच्या तुटवड्यामुळे सातत्यात खंड पडत आहे. महापालिका यंत्रणेने लसीकरणाच्या मोहिमेत ९८ हजार ८३९ नागरिकांना पहिल्या डोसचे तर १० हजार ४१४ नागरिकांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले.
सध्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिक भीतीमुळे केंद्रावर लस टोचून घेण्यासाठी गर्दी करत आहेत. जशी गर्दी वाढेल तसा लसीचा तुटवडा जाणवत आहे. रोज तीन हजार व्यक्तींचे लसीकरण करण्यात येते; परंतु आता लस नसल्यामुळे आजपासून लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागणार आहेत. बुधवारी एका दिवसात २४२८ नागरिकांना लस देण्यात आली.
कोल्हापूर शहरात १५९ पॉझिटिव्ह
कोल्हापूर शहरात बुधवारी १५९ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. शहरातील गेल्या काही दिवसांतील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे, तर ५७८ कोरोनाबाधित रुग्ण त्यांच्या घरातच उपचार घेत आहेत.