प्लास्टिक मुक्ती निमित्ताने विविध उपक्रम, महापालिकेचा पुढाकार : गुरुवारपासून कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 11:47 AM2019-10-01T11:47:13+5:302019-10-01T11:49:25+5:30
कोल्हापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची संकल्पना साकारण्यासाठी महापालिकेच्यावतीने आज, मंगळवारपासून तीन ...
कोल्हापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची संकल्पना साकारण्यासाठी महापालिकेच्यावतीने आज, मंगळवारपासून तीन दिवस ‘प्लास्टिक मुक्त व स्वच्छता हिच सेवा’ अभियान राबविण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारपासून प्लास्टिक विक्री करणाऱ्या, वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. महापालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या उप्रकमांची रूपरेषा आखण्याकरीता आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
आज, मंगळवारी शहरातील प्रत्येक प्रभागात कचरा संकलन करणाऱ्या टिप्परवरील कर्मचाऱ्यांतर्फे एकदाच वापरलेले गेलेले प्लास्टिक गोळा करण्यात येणार आहे. गांधी जयंतीदिवशी बुधवारी श्रमदानातून गांधी मैदान, शहरातील सर्व बागा, अंबाबाई मंदिर परिसर, बिंदू चौक व पार्किंग परिसर, दसरा चौक पार्किंग परिसर, रंकाळा तलाव या ठिकाणी श्रमदान करून प्लास्टिक संकलन करण्यात येणार आहे.
या उपक्रमात शहरातील शाळा, हॉटेल, सामाजिक संस्थांचा सहभाग राहणार आहे. त्याच दिवशी शहरातून रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी मनपाच्या शाळांमध्ये स्वच्छता स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
एकदाच वापरले जाणारे प्लास्टिक गोळा करण्याकरीता शाहूपुरी येथील ई - २ व बी वॉर्ड मंगळवार पेठ येथील आरोग्य कार्यालय कचरा संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी नागरिकांनी प्लास्टिक जमा करावे, असे आवाहन आयुक्त कलशेट्टी यांनी केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, प्रभारी उपआयुक्त धनंजय आंधळे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील, उपशहर अभियंता रमेश मस्कर, सचिन जाधव, आरोग्य निरीक्षक माधवी मसुरकर, माहिती शिक्षण व संवाद अधिकारी नीलेश पोतदार, पर्यावरण अधिकारी अपेक्षा सूर्यवंशी, एम.आय.एस.तज्ज्ञ पूजा बनगे आदी उपस्थित होते.