महापालिका : नेत्यांची फूस; ‘कारभारी’ सुटले बेफाम; सभेत होणार हातघाई
By admin | Published: September 26, 2016 12:55 AM2016-09-26T00:55:14+5:302016-09-26T00:55:14+5:30
महापालिका : नेत्यांची फूस; ‘कारभारी’ सुटले बेफाम; सभेत होणार हातघाई
तानाजी पोवार ल्ल कोल्हापूर
जिल्ह्याच्या राजकारणातील नेत्यांतील टोकाचा संघर्ष आता महापालिकेतील दोन्हीही आघाड्यांतून दिसून येत आहे. आघाडी नेत्यांनी ‘कारभाऱ्यां’ना फूस लावणे सोडून त्यांना वेळीच लगाम घालणे आवश्यक आहे, अन्यथा लवकरच दोन्हीही आघाडीत हे प्रकरण हातघाईवर येण्यास वेळ लागणार नाही. कनिष्ठ अधिकाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गळपट्टीला हात घालण्यापर्यंत या ‘कारभाऱ्यां’ची मजल गेली आहे. महापालिकेत शहराचा विकास करण्यासाठी पाठविलेल्या या नगरसेवकांकडून आता विकासापेक्षा कुरघोडीचे राजकारण केले जाऊ लागल्याने संपूर्ण शहराचा विकास खुंटला आहे. त्यामुळे विकासकामांबाबत कोल्हापूर राज्यात पाठीमागे पडू लागले आहे.
महापालिकेत सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. विकासकामांपेक्षा कुरघोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. राजकारणात महाडिक-पाटील यांच्यातील संघर्ष महापालिकेतील आघाड्यांतून बाहेर येऊ लागले आहे. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी काठावर बहुमत घेऊन विराजमान असताना विरोधी भाजप-ताराराणी आघाडीनेही राज्यातील सत्तेच्या जोरावर विकासनिधींचा सपाटा लावला आहे; पण नेत्यांतील राजकारणाचे पडसाद आता महापालिकेच्या आघाडीत उमटत आहेत. सत्ताधाऱ्यांतील काही कारभाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर दबावतंत्र टाकून सुरू केलेल्या कार्यपद्धतीला विरोधी आघाडीने थेट विरोध करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे दोन्ही आघाडीत नगरसेवकांत टोकाच संघर्ष सुरू झाला आहे. या राजकीय संघर्षात काही अधिकाऱ्यांचीही पिळवणूक सुरू आहे. नगरसेवकांचा विकासकामांऐवजी कुरघोडीमध्येच वेळ जाऊ लागला आहे, त्यामुळे शहराचा विकास खुंटला आहे.
अधिकाऱ्यांची खुर्ची बाहेर फेकण्यापासून, अपहरण ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गळ्याला हात घालण्यापर्यंत या ‘कारभाऱ्यां’ची मजल गेली आहे, नगरसेवक आणि प्रशासन यांच्यात दरी निर्माण झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ही वेळ येत असल्याने कनिष्ठ दर्जाचे अधिकाऱ्यांची अवस्था कल्पनेपलीकडे झाली आहे, त्यामुळे सेवानिवृत्ती, बदलीची अनेकांना घाई लागली आहे. दोन आघाड्यांतील वाद आता चांगलाच भडकला आहे.
विकासकामांत कोल्हापूर पिछाडीवर
वाद आणि आघाड्यांतील कुरघोडीमुळे ‘कारभारी’ प्रशासनावर दबाव टाकून आपली ‘काही’ कामे करून घेत आहेत. त्यातच दोन्हीही आघाडीतील वादामुळे शहराचा विकास खुंटत आहे. वर्षभरात एकही मोठे विकासकाम मंजूर झालेले नाही तर कचरा, वीज निर्मिती, कत्तलखाना, पाटणकर हायस्कूल व टाकाळा येथील जागेत व्यापारी संकुलवजा पार्किंग, पाणी योजना आदी कामे रेंगाळली आहेत. त्यामुळे यापूर्वी मुंबई, पुणे पाठोपाठ कोल्हापूरचा विकासात नंबर लागत होता, पण आता विकासात नाशिक आणि औरंगाबादनेही कोल्हापूरला मागे टाकले आहे.