मुरलीधर जाधव यांचे नगरसेवकपद रद्द करावे

By admin | Published: March 30, 2016 01:06 AM2016-03-30T01:06:52+5:302016-03-30T01:09:40+5:30

भाजपची निदर्शने : कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासनास शिष्टमंडळाचा इशारा

The municipal corporation of Murlidhar Jadhav should be canceled | मुरलीधर जाधव यांचे नगरसेवकपद रद्द करावे

मुरलीधर जाधव यांचे नगरसेवकपद रद्द करावे

Next


कोल्हापूर : महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांचे बेटिंग व्यवसायाशी संबंध असून, एका गुन्ह्यात त्यांचे नाव समोर आले आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद तत्काळ रद्द करावे, या मागणीसाठी मंगळवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने महापालिकेसमोर निदर्शने केली. उद्या, गुरुवारी होणाऱ्या सभेत जाधव यांना नवीन वर्षाचे अंदाजपत्रक मांडू देणार नाही, असा इशाराही पक्षाच्यावतीने प्रशासनास देण्यात आला.
गेल्या चार दिवसांपासून मुरलीधर जाधव यांचा बेटिंग व्यवसायाशी असलेल्या संबंधांची चर्चा होऊ लागली आहे. तसेच बेटिंग घेणाऱ्या ज्या पंटरांना पोलिसांनी अटक केली त्यांनीही जाधव यांचा सहभाग असल्याचे सांगितले आहे; म्हणूनच जाधव यांनी राजीनामा द्यावा किंवा प्रशासनाने त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, या मागणीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
मनपासमोर झालेल्या सभेत जिल्हा सरचिटणीस विजय जाधव यांनी जाधव यांच्यावर टीका करत प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेण्याचे आवाहन केले. महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी जाधव यांना महापालिकेचा अर्थसंकल्प मांडू देणार नाही, असा इशारा दिला. बेटिंगमध्ये नाव आल्यामुळे स्थायी समिती सभापतिपद तसेच कोल्हापूरचे नाव बदनाम होत आहे, त्यामुळेच मनाची लाज राखून त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणीही देसाई यांनी यावेळी केली.
त्यानंतर भाजपचे शिष्टमंडळ उपायुक्त विजय खोराटे यांना भेटले. मुरलीधर जाधव यांचे बेटिंग व्यवसायाशी संबंध असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशी मागणी देसाई यांनी उपायुक्तांकडे केली.
शिष्टमंडळात नगरसेवक अजित ठाणेकर, राहुल चिकोडे, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, दिलीप मैत्राणी, संतोष भिवटे, अ‍ॅड. संपतराव पवार, हर्षद कुंभोजकर, तौफीक बागवान, सुरेश जरग, कविता पाटील, रेखा वालावलकर, विजयमाला देसाई, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)

Web Title: The municipal corporation of Murlidhar Jadhav should be canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.