वाद टाळण्यासाठी महापालिकेत ‘तंटामुक्ती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2016 01:06 AM2016-12-31T01:06:18+5:302016-12-31T01:06:18+5:30
बैठकीत निर्णय : महापौर हसिना फरास यांच्याकडे जबाबदारी; सामोपचाराने वाद मिटवणार
कोल्हापूर : प्रभागातील तसेच प्रशासकीय पातळीवरील कामे होण्यात दिरंगाई होते, अधिकारी-कर्मचारी बेजबाबदारपणे उत्तरे देतात; त्यामुळे नगरसेवकाकडून अधिकाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण होण्याचे आणि अधिकाऱ्यांकडून नगरसेवकांविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांत वाढले आहेत. यापुढे असले प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी घेण्याचा; तसे घडलेच तर ते सामोपचाराने मिटविण्यासाठी महापौर हसिना फरास यांच्या अध्यक्षतेखाली ‘तंटामुक्ती समिती’ स्थापन करण्याचा निर्णय शुक्रवारी महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर हसिना फरास होत्या.
नगरसेवक काही घरातील कामे सांगत नाहीत; त्यामुळे सांगितलेली कायदेशीर व जनहिताची कामे त्वरित झाली तर नगरसेवकांकडून कोणतेही गैरकृत्य होणार नाही, अशी हमी नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली; तर कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे, तांत्रिक कारणांनी काही कामे अडणार असतील तर सहकार्य करावे, अशी अपेक्षा आयुक्त पी. शिवशंकर यांनी व्यक्त केली. कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईलच; पण कायदा हातात घेऊन शिवीगाळ, मारहाण करण्याचे प्रकार टाळावेत, असेही आवाहन त्यांनी केले. नगरसेवक प्रभागातील योग्य कामे सांगत असतील तर अधिकाऱ्यांनी तातडीने त्यांत लक्ष घालावे कामे झाली नाहीत म्हणून कोणी संतापाने बोलत असेल तर ती धमकी समजू नय काही अधिकारी खोट्या तक्रारी देण्याची शक्यता आहे; म्हणून आयुक्त शिवशंकर यांनी घडणाऱ्या प्रकाराची सत्यता पडताळून पाहावी. कोणीतरी सांगतो म्हणून थेट पोलिसांत गुन्हे दाखल केले जाऊ नयेत, अशी अपेक्षा विजय सूर्यवंशी, सत्यजित कदम, भूपाल शेटे, अजित ठाणेकर यांनी व्यक्त केली.
एकाच प्रश्नाबाबत चार-सहा महिने तक्रारी कराव्या लागतात. स्थायी समितीत वर्षभर प्रश्न मांडले तरी ते सुटत नाहीत; त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कारवाई केलीच पाहिजे, असा आग्रह अजित ठाणेकर यांनी धरला. आरोग्य विभागातील ४० टक्के लोक अन्य विभागांत काम करीत आहेत. अशा कर्मचाऱ्यांना मूळ कामावर नेमावे; तसेच कर्मचारी संघटनेनेही कर्मचाऱ्यांना समजावून सांगावे, असे आवाहन शेटे यांनी केले. यावेळी स्थायी सभापती मुरलीधर जाधव, सभागृह नेता प्रवीण केसरकर, रूपाराणी निकम, शारंगधर देशमुख यांनी कर्मचाऱ्यांच्या दोषांवर बोट ठेवले. यावेळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी संघटनेचे नेते उपस्थित होते.
कारवाई केल्यास
हस्तक्षेप नाही
कामचुकार कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई केल्यास त्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. कोणी सतत गैरहजर राहत असेल तर त्याच्यावर कारवाई करा, आम्ही काही विचारणार नाही, असे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेश देसाई यांनी सांगितले; तर आचारसंहिता तयार करा, तिचे पालन करण्याची आमची तयारी असल्याचे कार्याध्यक्ष विजय वणकुद्रे यांनी सांगितले.
दोन अधिकाऱ्यांच्या राजकारणात मला बदनाम करण्यात आले. मी कोणालाही मारहाण केली नाही, तसेच रिव्हॉल्व्हरने धमकावलेही नाही. कोणाला धमकावले त्यास माझ्यासमोर उभे करा; मी त्याक्षणी नगरसेवकपदाचा राजीनामा देईन, असे नगरसेवक राजू दिंडोर्ले यांनी सांगितले.
४माझ्या प्रभागात स्वखर्चाने २०० ट्रीगार्ड, २० सीसीटीव्ही कॅमेरे,बसविले आहेत. इतके चांगले सामाजिक काम करणारा माणूस रिव्हॉल्व्हर दाखवितो, असा आरोप करणे योग्य नाही. अधिकाऱ्यांच्या राजकारणातून आरोप झाला असून, बनवेगिरी करण्यात आल्याचे दिंडोर्ले यांनी सांगितले.