‘बीओटी’वर चालणार महापालिकेची गाडी

By admin | Published: April 1, 2016 01:03 AM2016-04-01T01:03:53+5:302016-04-01T01:24:18+5:30

अर्थसंकल्प : चार मार्केट, बहुमजली पार्किंग, मेडिकल हेल्थ सिटी, वाय-फाय यंत्रणेचा समावेश--महानगरपालिका अर्थसंकल्प

Municipal Corporation run on 'BOT' | ‘बीओटी’वर चालणार महापालिकेची गाडी

‘बीओटी’वर चालणार महापालिकेची गाडी

Next

कोल्हापूर : महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे राज्य व केंद्र सरकारच्या मदतीची अपेक्षा न करता ‘बीओटी’वर शहर विकासाचा कार्यक्रम राबविण्याचा संकल्प कोल्हापूर महानगरपालिकेच्या नवीन वर्षाच्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. बहुमजली पार्किंग,
वाय-फाय सेवा, मेडिकल हेल्थ सिटी याच्यासह शिंगोशी, कपिलतीर्थ, ताराराणी व शाहू क्लॉथ, आदी मार्केट बीओटीवर विकसित करण्यात येणार आहेत, तर शहरातील विविध प्रकल्पांतून प्राप्त होणाऱ्या प्रीमियममधून मुख्य प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेचा सन २०१६-२०१७ सालाचा नवीन वर्षाचा अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांनी गुरुवारी महासभेसमोर मंजुरीसाठी मांडला. प्रशासनाने १८ मार्चला ११३२ कोटी जमेचा आणि पाच कोटी २६ लाख इतके शिल्लकी अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर केले होते. त्याला अंतिम रूप देऊन आवश्यक त्या फेरबदलांसह सभापती जाधव यांनी हा अर्थसंकल्प महासभेत मांडला. विशेष म्हणजे तो अर्थसंकल्प सादरीकरणासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंगचा आधार घेण्यात आला. त्यासाठी सभागृहात तीन एलईडी बसविण्यात आले होते.
प्रशासनाने दिलेल्या अंदाजपत्रकातील आकडेवारीत जमेच्या बाजूला महसुली व भांडवली २२ कोटी ०८ लाख रुपयांची वाढ सुचविण्यात आली आहे. या वाढीव रकमेतून सात कोटी ९२ लाख रुपये महसुली व भांडवली खर्चाकडे वळविण्यात आले आहेत, तर दीड कोटी रुपये के.एम.टी.ला अर्थसहाय देण्याची सूचना अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. डांबरी रस्ते पॅचवर्कसाठी ८० लाखांची नव्याने तरतूद करण्यात आलेली आहे. नव्याने समाविष्ट करण्यात आलेले ‘बीओटी प्रकल्प वगळता’ स्थायी समितीने प्रशासनाच्या अंदाजपत्रकात फारसा बदल केलेला नाही.


‘बीओटी’वर उभारण्यात
येणारे प्रकल्प
०१ मध्यवर्ती बसस्थानक येथे बहुमजली कार पार्किंग प्रकल्प
०२ शहरात आॅप्टिकल फायबर केबलद्वारे वाय-फाय सेवा उपलब्ध करणार.
०३ आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी आयसोलेशन हॉस्पिटलच्या आरक्षित जागेत मेडिकल हेल्थ सिटी उभारणार.
०४ महानगरपालिकेच्या मालकीची शिंगोशी, कपिलतीर्थ, ताराराणी व शाहू क्लॉथ ही चार मध्यवर्ती मार्केट विकसित करणार.

नगरसेवकांना असा मिळणार निधी
प्रभागात मूलभूत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक नगरसेवकांना सहा लाख, तर स्वीकृत नगरसेवकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा निधी देणार.
स्थायी समितीवर सदस्य असणाऱ्या सोळा नगरसेवकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा अतिरिक्त निधी देणार
विशेष अधिकारात महापौरांना १५ लाख, उपमहापौरांना १० लाख, स्थायी सभापतींना १५ लाख, सभागृहनेता १० लाख, तर विरोधी पक्षनेता १० लाखांचा जादा निधी देणार.
या व्यतिरिक्त विविध विकासकामे करण्यासाठी दोन कोटी ६५ लाख, तर प्रभागातील लोकोपयोगी कामे करण्यासाठी तीन कोटी ७६ लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे.

Web Title: Municipal Corporation run on 'BOT'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.