‘मनपा’त ७६ लाखांची बोगस वैद्यकीय बिले मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 01:00 AM2017-10-08T01:00:22+5:302017-10-08T01:04:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : एकीकडे झाडू कामगारांना पाचशे, हजार रुपयांची वैद्यकीय बिले मंजूर करताना खालवर बघणाºया अधिकाºयांनी महापालिकेच्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाºयांची मात्र बोगस बिले मंजूर करून संगनमताने ७५ लाख ९६ हजारांची लूट केल्याचा आरोप नगरसेवक भूपाल शेटे यांनी शनिवारी केला. ज्यांनी बिले घेतली आहेत, ते कशामुळे आजारी होते? आजारी होते त्या कारणासाठी वैद्यकीय बिल देय आहेत का? याची सखोल चौकशी करावी आणि त्यामध्ये गैरव्यवहार आढळल्यास संबंधितांकडून बिलाच्या रकमा व्याजासह वसूल कराव्यात, अशाी मागणीही त्यांनी यावेळी केली.
हा प्रकार गेल्या साडेचार वर्षांत घडलेला असून, त्यामध्ये मनपाच्या १८ डॉक्टरांसह काही नर्स, वॉर्डबॉय, आया यांचा समावेश आहे. कायद्यातील तरतुदीनुसार वैद्यकीय उपचार घेण्यासाठी आधी मनपा रुग्णालयात दाखल व्हावे. तेथे उपचार नसतील तर शासकीय रुग्णालयात दाखल व्हावे, असा नियम आहे. तसेच शस्त्रक्रिया झालेल्या तसेच गंभीर आजारी असणाºया व्यक्तींना हा खर्च घेता येतो; परंतु स्वत: डॉक्टर असूनही दुसºयांच्या रुग्णालयात औषधोपचार घेतल्याचे भासवून ही बिले मंजूर करून घेतली असल्याचे नगरसेवक भूपाल शेटे यांनी सांगितले.
रक्तदाब, मधुमेह, उदरवेदना (छातीतील कळ) यांसारख्या आजारांना वैद्यकीय बिल घेता येत नाही. तरीही ती डॉक्टरांनी घेतली आहेत. मनपाच्या रुग्णालयांत प्रत्येक वर्षी ४५ लाखांची औषधे घेतली जातात व ती रुग्णांना दिली जातात. मग, या डॉक्टरांनी बाहेरून औषधोपचार घेण्याची गरज काय होती? असा शेटे यांचा सवाल आहे. एक तर भूलतज्ज्ञ सासूच्या आजारपणाचे प्रत्येक महिन्याला ५९३४ रुपये बिल घेतात, तर एका फिजिओथेरपिस्टने शस्त्रक्रिया झालेली नसतानाही एक लाख ८६ हजार रुपयांचे वैद्यकीय बिल मंजूर करून घेतल्याची माहिती शेटे यांनी दिली.
कागदोपत्री आजारपण दाखवून बोगस बिल घेणाºया डॉक्टरांसह सर्वच कर्मचाºयांची जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत चौकशी करावी. जर त्यांनी बोगस बिले उचलली असल्याचे स्पष्ट झाले, तर त्यांच्याकडून व्याजासह रकमा वसूल कराव्यात,अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
खासगी रुग्णालयात सेवा अधिक
महानगरपालिकेतील सर्वच डॉक्टर पगार घेत असलेल्या संस्थेत केवळ तास ते दीड तास काम करतात आणि त्यानंतर स्वत:च्या खासगी रुग्णालयात अधिक काम करतात, असा भूपाल शेटे यांचा दावा आहे. १२ कर्मचारी व तीन ड्रेसर हे रुग्णालयात काम न करता अन्य कार्यालयात काम करतात. त्यांना सावित्रीबाई रुग्णालयात पाठवावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
आर्थिक वर्ष मंजूर वैद्यकीय बिलांची रक्कम
२०१३-१४ १४ लाख ९३ हजार
२०१४-१५ १७ लाख ६४ हजार
२०१५-१६ १३ लाख ५१ हजार
२०१६-१७ २३ लाख ८२ हजार
१ एप्रिल २०१७ पासून ६ लाख