महापालिकेमार्फत घनकचऱ्यावर प्रक्रिया सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:30 AM2021-02-25T04:30:40+5:302021-02-25T04:30:40+5:30
मुंबई येथील कोल्हापूर ग्रीन एनर्जी कंपनीने शहरातील दैनंदिन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा ठेका घेतला होता. प्रकल्पस्थळी ठेकेदाराकडून बायोगॅस, खत, आरडीएफ ...
मुंबई येथील कोल्हापूर ग्रीन एनर्जी कंपनीने शहरातील दैनंदिन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा ठेका घेतला होता. प्रकल्पस्थळी ठेकेदाराकडून बायोगॅस, खत, आरडीएफ (ज्वलनशील पदार्थ) तयार करण्याचे काम येथे सुरू होते परंतु गेल्या दोन महिन्यांपासून कंपनी आर्थिक अडचण निर्माण झाल्यामुळे काम थांबविले होते. त्याचा परिणाम दैनंदिन कचरा निर्गतीवर झाला होता. कचऱ्याचे प्रचंड ढीग प्रकल्पस्थळावर साचून राहिले होते. रोज येणारा कचरा कुठे टाकायचा याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत ‘लोकमत’ने शुक्रवारच्या अंकात सचित्र वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.
वृत्ताची दखल घेत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी संबंधित ठेकेदाराचा ठेका स्थगित करून प्रकल्प ताब्यात घेण्याचे आदेश आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला होता. त्यानुसार सर्व कायदेशीर पाठपुरावा करून सोमवारी हा प्रकल्प ताब्यात घेतला. मंगळवारी तेथील यंत्राची डागडुजी केल्यानंतर बुधवारी या प्रकल्पाचे काम महापालिकेने सुरू केले. या प्रकल्पाची जबाबदारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
बुधवारी भाजीपाला कचऱ्यापासून बायोगॅस, घनकचऱ्यापासून खतनिर्मिती केली जात असून प्लास्टिक विलगीकरणाचे काम सुरू करण्यात आले. पहिल्याच दिवशी रोज येणाऱ्या १८० टन कचऱ्यापैकी सत्तर टक्के कचऱ्यावर प्रक्रिया सुरू झाली. पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प सुरू राहण्यासाठी काही यंत्रांची दुरुस्ती हाती घेतली असून शनिवार किंवा रविवारपासून प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.