महापालिकेत स्थिर महापौर देणार --आमचा पक्ष आमची भूमिका
By admin | Published: October 12, 2015 12:19 AM2015-10-12T00:19:51+5:302015-10-12T00:25:19+5:30
‘लोकमत’शी थेट संवाद : ‘४१ प्लस’ शिवसेनेचे मिशन असल्याचा आमदार राजेश क्षीरसागर यांचा दावा-
महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच भाजप-शिवसेना स्वतंत्रपणे लढत आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचा जाहीरनामा आणि भूमिका काय आहे, हे आमदार राजेश क्षीरसागर यांनी ‘लोकमत’शी संवाद साधून स्पष्टपणे मांडली. यावेळी त्यांनी शहराच्या विकासासाठी आपला पक्ष काय करणार याची ‘ब्लू प्रिंट’ मांडून स्वच्छ कारभार आणि गतिमान प्रशासन देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
कोल्हापूर : ‘४१ प्लस’ हे मिशन डोळ्यांसमोर ठेवून शिवसेना महानगरपालिकेची निवडणूक लढवीत आहे. चळवळ आणि विकासकामांच्या माध्यमातून पक्षाने जनतेशी नाळ कायम ठेवली आहे. त्यामुळे या निवडणुकीत नक्कीच बहुमताचा जादूई आकडा पूर्ण करीत शिवसेना कुणाच्या कुबड्या न घेता महापालिकेची सत्ता एकहाती काबीज करील. तसेच कोल्हापूर शहराला पदाची खांडोळी न करता स्थिर महापौर देईल, असा विश्वास आमदार राजेश क्षीरसागर यांनी शनिवारी सायंकाळी येथे व्यक्त केला. विधानसभेला कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने जशी शिवसेनेला भरभरून साथ दिली, त्याचीच पुनरावृत्ती महापालिका निवडणुकीतही करावी, असे आवाहनही आमदार क्षीरसागर यांनी यावेळी केले.
त्यांनी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयाला भेट देऊन निवडणुकीतील भूमिका व जाहीरनामा यांचे सविस्तर विवेचन केले. क्षीरसागर म्हणाले, १९७२ साली महापालिका अस्तित्वात आल्यानंतर आजतागायत शहराची एक इंचही हद्दवाढ झाली नाही. भाजपकडूनच हद्दवाढीला विरोध होत आहे. उद्योजकांसाठी हा विरोध आहे; परंतु हद्दवाढ का नको असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. शहरात राहायचे आणि हद्दीत यायला नको, हा दुटप्पीपणा या लोकांनी सोडला पाहिजे. तुम्ही एलबीटी तसेच जकात या माध्यमातून पैसे घेता, तर शहराच्या विकासाला हातभार लावायला मागे का?
नगरसेवकांना १९८५ ते ९० पर्यंतच्या काळात विशेष आदर होता. त्यांना जनाची नाही तर मनाची लाज होती; परंतु त्यानंतरच्या सभागृहात चित्र बदलले आहे. आता प्रतिष्ठेसाठी महापालिकेत निवडून जाऊन बाजार मांडला जात आहे. त्यामुळे विकासकामांसाठी चांगले कंत्राटदार कोल्हापूरला यायला तयार नाहीत. ‘नगरोत्थान’सारख्या योजनेतून अनेक कंत्राटदारांनी कामे अर्धवट सोडली आहेत.
सध्याच्या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून निधी मिळविण्यासाठी कोणतीही धोरणे राबविली जाताना दिसत नाहीत. गत तीस वर्र्षांतील २५ वर्षे ताराराणी आघाडीची सत्ता राहिली. त्यांनी महापौरांसह सर्वच पदांची खांडोळी करून चुकीची पद्धत रूढ केली. त्याचाच कित्ता सध्याची कॉँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी गिरवत आहे. या पाच वर्षांतील कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा कारभारही चांगला नसून, तोही भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे. राष्ट्रवादीच्या महापौरांच्या लाच प्रकरणाने तर कोल्हापूरची मान शरमेने खाली गेली आहे. कॉँग्रेस व राष्ट्रवादीने निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या जाहीरनाम्याला त्यांनीच हरताळ फासला आहे. कोणतीही करवाढ करणार नाही, शासकीय जमिनींवर आरक्षण टाकणार नाही, असे म्हणणाऱ्या या आघाडीने प्रत्यक्षात घरफाळ्यात वाढ केली. तसेच जमिनींवरील आरक्षणे उठवून त्या जमिनी धनदांडग्यांच्या देऊन भ्रष्टाचार केला. या कार्यकाळातील एकच चांगले काम म्हणता येईल, तेही थेट पाईपलाईनचे. परंतु त्यासाठीही आपण जुलै २०१२ मध्ये पावसाळी अधिवेशनात आमरण उपोषण केल्यावर सरकारचे डोळे उघडले.
विकासाचे व्हिजन
गेल्या तीस वर्षांतील ताराराणी आघाडी व कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसचा गैरकारभार व भ्रष्टाचार जनतेला माहीत आहे. त्यामुळे एक चांगले शहर घडवायचे असून लोकांना सुशासन द्यायचे आहे. चांगले रस्ते, कचरा निर्गतीकरण, भुयारी गटर योजना, उद्याने, रंकाळा व पंचगंगा प्रदूषणमुक्ती, तीर्थक्षेत्र विकास, फेरीवाला धोरण व झोपडपट्टी विकास, बचत गटांसाठी बचत भवन, सुसज्ज व्यायामशाळा हे शिवसेनेचे शहराच्या विकासाचे व्हिजन आहे. ते घेऊनच लोकांसमोर जाणार आहोत. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ३०० कोटींच्या निधीसाठी
आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला आहे. त्यानंतर ते राज्य शासनाने बहुधा बाजूलाही काढून ठेवले आहेत; परंतु आपल्याला ते श्रेय मिळू नये यासाठी काहींचा प्रयत्न असून, त्यामुळेच ते अद्याप आले नसल्याची शंका असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
३० वर्षांत प्रश्न प्रलंबितच
शहरवासीयांना पिण्यासाठी चांगले पाणी मिळत नाही. रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आणि वाईट झाली आहे. गटारी व ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे. यासह मुलांना खेळायला प्रशस्त क्रीडांगणे नाहीत, उद्याने नाहीत, वाहतूक यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. शहराबाहेरील अरुंद रस्त्यांमुळे अपघात होत आहेत. रेल्वे, विमानतळ असे अनेक प्रश्न गेल्या
३० वर्षांत सत्ताधारी सोडवू शकले नाहीत.
शिवसेना नेहमीच जनतेबरोबर
गेल्या सात-आठ वर्षांत सातत्याने शहरातील विविध सामाजिक प्रश्नांवर शिवसेनेने आवाज उठविण्याचे काम केले आहे. टोल आंदोलन हे जरी सर्वपक्षीय असले तरी त्याला आक्रमक स्वरूप देऊन टोलनाके जाळण्याचे काम शिवसेनेनेच केले आहे. याची दखल घेत देशभर टोलविरोधी आंदोलन सुरू झाले. त्याचबरोबर ‘एलबीटी’सह शिक्षणसम्राटांंविरोधातील आंदोलनाच्या माध्यमातून संबंधितांना न्याय देण्याचे काम शिवसेनेनेच केले आहे.
चळवळ अन् विकासातून जनतेशी संपर्क
गेल्या पाच वर्षांत विविध आंदोलने व चळवळीच्या माध्यमातून तसेच सध्या विविध विकासकामांद्वारे शिवसेना व आपण जनतेच्या संपर्कात आहोत. रिक्षांना मोफत ई-मीटर, सहा हजार नागरिकांची मोफत आॅपरेशन (कॅन्सर, बायपास, आॅर्थो, आदी) आपल्या माध्यमातून करण्यात आली आहेत. ५० लाखांचे संगणक शाळांना देण्यात आले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, वॉकिंग ट्रॅकही करण्यात आले आहेत.
‘भाजप-ताराराणी’ २०च्या पुढे जाणार नाही
या निवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीच्या २०च्या पुढे जागा जाणार नाहीत. उलट शिवसेना मिशनप्रमाणे ‘४१ प्लस’ पूर्ण करील.
शिवसेनेकडे इच्छुकांची गर्दी
भाजप-ताराराणी आघाडीकडून पैशाचा भरपूर वापर होताना दिसत आहे. तिकीट देताना इच्छुकांकडे जाऊन त्यांना २५ लाखांची आॅफर दिली जात आहे. तरीही त्यांच्याकडे कोणी जायला तयार नाही. उलट शिवसेना कुणाच्या दारात न जाताही इच्छुकच उमेदवारी मागायला येत आहेत. यामुळे शिवसेनेकडे इच्छुकांची गर्दी दिसत आहे.
पदांच्या खांडोळ्या आर्थिक उलाढालीसाठी
महापालिकेत पदांच्या खांडोळ्या या निव्वळ आर्थिक उलाढालीसाठीच झाल्या आहेत. त्यामुळे सुशिक्षित व विकासाची दृष्टी असणारीच व्यक्ती महापौर म्हणून देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असून या पदाचा कार्यकाळ हा पूर्ण असेल. त्याचबरोबर आपण स्वत: महापालिकेच्या कारभारावर नियंत्रण ठेवून चांगला कारभार व उत्कृष्ट प्रशासन देण्याचा प्रयत्न करू.
नेत्यांच्या तोफा धडाडणार
महापालिकेच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मंत्री रामदास कदम, प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांच्यासह नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत. त्याबरोबर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा रोड शोही होणार आहे. शहरात प्रचाराचे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. १० व्हिडीओ गाड्या शहरात फिरविण्यात येणार आहेत. याद्वारे शिवसेनाप्रमुखांची भाषणे ऐकविली जाणार आहेत. त्याचबरोबर वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया, तसेच सोशल मीडियाद्वारे आधुनिक संवाद माध्यमातून देखील प्रचाराची यंत्रणा राबविली जाणार आहे.
( प्रतिनिधी )
‘बंटी-मुन्ना’ आपले चांगले मित्र
राजकारणात कुणी कुणाचे कायमस्वरूपी मित्र वा शत्रू नसतात. विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसच्या काही नगरसेवकांनी थेट आपल्या व्यासपीठावर येऊन पाठिंबा दिला. खासदार धनंजय महाडिक व सतेज पाटील हे आपले चांगले मित्र आहेत; पण पक्षीय राजकारणात त्यांच्या मैत्रीपोटी शिवसेनेशी गद्दारी कधी केली नाही आणि करणारही नाही. तसेच लोकसभेला संजय मंडलिक यांना कोल्हापूर उत्तरमधून पाच हजार मतांचे मताधिक्य मिळवून दिले असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
लायकी नसणाऱ्यांच्या हट्टापायी युती तुटली
भाजप-ताराराणीच्या यादीत निम्म्यापेक्षा अधिक गुंडापुंडांना संधी दिली आहे. गेल्या निवडणुकीत ज्यांच्यावर मटकेवाले म्हणून ते जाहीरसभेत टीका करत होते तेच लोक आता दादांच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत. भाजपच्या डिजीटल बोर्डावरील चेहरे हे साधुसंतांचे आहेत का..? सोयीनुसार बोलणाऱ्या दादांचा आणि भाजपचा हा दुटप्पीपणा आहे. लायकी नसणाऱ्या चार-पाचजणांच्या हट्टापायी दादांनी युती तोडली, अशी टीकाही क्षीरसागर यांनी केली.
‘आर. डीं.’वर दहा कोटींचा दावा
आर. डी. पाटील यांनी आपल्यावर केलेल्या आरोपांबाबत त्यांच्यावर दहा कोटींचा अबु्रनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्याची नोटीस चार दिवसांत त्यांना मिळेल, असेही क्षीरसागर यांनी सांगितले.
महाडिकांनी महापौरपदाची किंमत घालवली!
ताराराणी आघाडीच्या माध्यमातून आमदार महादेवराव महाडिक यांनी तीन महिन्यांचा महापौर, ४७ दिवसांचा स्थायी सभापती करून त्या पदांची किंमत घालवली. पळणाऱ्या पाच घोड्यांवर पैसे लावायचे आणि जो निवडून येईल तो आपला, असे राजकारण महाडिकांनी केले. विधान परिषदेच्या राजकारणासाठी त्यांनी कोल्हापूरला ‘भकास’ केल्याचा आरोप आमदार क्षीरसागर यांनी केला.