महापालिका : वाहतूक नियमनाच्या बैठकीत खडाजंगी, पण तोडगा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 01:26 PM2021-02-26T13:26:17+5:302021-02-26T13:30:02+5:30

muncipalty Kolhapur- कोल्हापूर शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याच्या नियोजनासाठी गुरुवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत केबिन हटविण्याच्या मुद्द्यवरून फेरीवाले नेते आणि महापालिका अधिकारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

Municipal Corporation: Traffic regulation meeting is tumultuous, but there is no solution | महापालिका : वाहतूक नियमनाच्या बैठकीत खडाजंगी, पण तोडगा नाही

कोल्हापूर महापालिकेत गुरुवारी शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी फेरीवाले, महापालिका प्रशासन, शहर वाहतूक शाखा यांची संयुक्त बैठक प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

Next
ठळक मुद्दे महापालिका : वाहतूक नियमनाच्या बैठकीत खडाजंगी, पण तोडगा नाही केबिनवरील कारवाईवरून वाद : प्रशासकही भडकल्या

कोल्हापूर : शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याच्या नियोजनासाठी गुरुवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत केबिन हटविण्याच्या मुद्द्यवरून फेरीवाले नेते आणि महापालिका अधिकारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे याही भडकल्या. वाद घालणार असाल तर बैठक थांबवू, असा दम त्यांनी दिला. यावेळी काहीकाळ तणावपूर्ण वातावरण झाले. वाहतूक नियमनाबाबत मात्र या बैठकीतून फारसे ठोस निष्पन्न झाले नाही.

सर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीने वाहतुकीला शिस्त आणण्यासाठी सहकार्य करू, अशी ग्वाही दिली. मात्र, फेरीवाल्यांना हटवून पार्किंग करणार असाल तर मान्य नाही, अशीही भूमिका घेतली.

शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी म्हणाल्या, शहरातील मुख्य रस्ते, चौकात शिस्त नसल्यामुळे नेहमी वाहतुकीची वर्दळ होत आहे. व्यावसायिकांनी दुकानासमोर केलेले अतिक्रमण, त्यापुढे फेरीवाले आणि त्यांच्यासमोर लावली जाणारी वाहने ही याला कारणीभूत आहेत. याला शिस्त लागणे आवश्यक आहे.

बाहेरून येणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करा

आर. के. पोवार म्हणाले, शहरातील वाहतूक व्यवस्था आम्हाला बिघडवायची नाही. प्रशासनाला याबाबत संपूर्ण सहकार्य राहील. वाहतुकीस अडथळा होणारे मुख्य रस्ता, चौकातील सर्व फेरीवाले हटवू, पण त्यांचे पुनर्वसन कुठे केले जाणार, हे प्रशासनाने स्पष्ट करावे.

प्रशासनाने फेरीवाले धोरणाची अंमलबजावणी करावी. ६८०० पात्र फेरीवाल्यांना पट्टे मारून द्या, पट्ट्याच्या बाहेर कोणी आल्यास त्यांच्यावर कारवाई करा. बाहेरगावाहून टेम्पोतून द्राक्षे, भाजी, लसूण घेऊन येणाऱ्यांमुळेच वाहतुकीची कोंडी होत आहे. अशांवर कारवाई केल्यास कृती समिती विरोध करणार नाही.

कोंडा ओळला वाहतूक कोंडी कुणामुळे?

केवळ फेरीवाल्यांमुळेच वाहतुकीची शिस्त बिघडते असे म्हणणे चुकीचे आहे. लक्ष्मीपुरी, शाहूपुरीत दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. कोंडाओळला तर दुकानदारांनी दुकानासमोर सिमेंटचा गिलावा करून साहित्य मांडले आहे. त्यामुळे रोज वाहतुकीची कोंडी होते. बेशिस्त वाहने पार्किंगकडे कानाडोळा केला जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कृती समितीने बैठकीत केली.

वळंजू, पंडित पोवार यांच्यामध्ये खडाजंगी

नंदकुमार वळंजू यांनी महाद्वार चौकात फेरीवाल्यांना हटविल्यानंतर वाहनांचे पार्किंग सुरू झाल्याचे आणि कपिलतीर्थ मार्केट येथे आत असलेल्या केबिनवर कारवाई केल्याचे निदर्शनास आणले. यावर अतिक्रमण निर्मूलन पथकाचे पंडित पोवार यांनी, बाजारपेठ म्हटल्यावर नागरिक वाहने लावणारच, येथून पुढेही बेकायदेशीर केबिनवर कारवाई करणारच, अशी भूमिका मांडली.

यावर वळंजू आणि आर. के. पोवार आक्रमक झाले. त्यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. प्रशासक बलकवडे याही संतप्त झाल्या. वाद घालणार असाल तर बैठक थांबवू, असा इशारा त्यांनी दिला. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत आणि फेरीवाला समितीचे प्रशासकीय सचिव संजय भोसले यांनी मध्यस्थी करून वादावर पडदा टाकला.

कोण, काय म्हणाले...

  • दिलीप पवार : चारचाकी पार्किंग चालते, मग फेरीवाले का नको? फेरीवाल्यांना हटवण्यापूर्वी व्यवसाय होणाऱ्या ठिकाणी पुनवर्सन करा.
  • राजू जाधव : रस्ते तेवढेच, पण वाहने, लोकसंख्या वाढली. फेरीवाल्यांना जबाबदार धरू नका.
  • किशोर घाटगे : अंबाबाई मंदिर परिसरात शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय असल्याने वाहतुकीवर ताण.
  • अशोक भंडारे : फेरीवाल्यांना काढून पार्किंग होऊ देणार नाही. पहिले पुनर्वसन नंतर निर्मूलन करा.
  • महंमदशरीफ शेख : वाढलेली वाहनेच बेशिस्त वाहतुकीला कारण, फेरीवाला संपला तरी प्रश्न कायम राहणार.


नागरिकांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले. त्यामुळे शिस्त लागणे गरजेचे आहे. फेरीवाल्यांचा व्यवसाय बंद करणे हा विषय नाही. त्यामुळे सर्वांवरच कारवाई केली जाणार नाही. दुकानदारांनी दारात केलेले अनधिकृत बांधकाम, अपात्र फेरीवाले, बेकायदेशीर केबिन कोणत्याही स्थितीत हटविणार आहे.
- डॉ. कादंबरी बलकवडे,
प्रशासक, महापालिका.

 


 

Web Title: Municipal Corporation: Traffic regulation meeting is tumultuous, but there is no solution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.