आमदारांकडून पालिका कारभाराची झाडाझडती

By admin | Published: May 21, 2015 11:33 PM2015-05-21T23:33:19+5:302015-05-22T00:10:13+5:30

मुख्याधिकारी : मक्तेदार नगरसेवकांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देणार

Municipal corporation tree plantation | आमदारांकडून पालिका कारभाराची झाडाझडती

आमदारांकडून पालिका कारभाराची झाडाझडती

Next

इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या विविध विभागांकडील कामांचा मक्ता घेणाऱ्या नगरसेवकांचा गोपनीय अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सुनील पवार यांनी आ. सुरेश हाळवणकर यांना दिली. पालिका कारभाराबाबत मोठ्या प्रमाणात गोंधळ उडून नगरसेवकांकडूनच तक्रारी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे आमदार सुरेश हाळवणकर यांनी पालिकेत येऊन कामकाजाबाबत ताशेरे ओढले असता ही माहिती पवार यांनी दिली.
पालिकेसमोर प्रभागातील स्वच्छता व नागरी सेवा-सुविधांसाठी शहर विकास आघाडीचे नगरसेवक संतोष शेळके यांनी दोन दिवस उपोषण केले, तर काही नगरसेवकांनी पालिकेकडील बांधकाम खात्याच्या कामकाजाबाबत तक्रारी केल्या. या पार्श्वभूमीवर गुरुवारी आ. हाळवणकर नगरपालिकेत आले. त्यांनी तडक मुख्याधिकारी पवार यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्यावर विविध प्रश्नांचा भडीमार केला आणि पालिकेच्या एकूण कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली.
आमदारांबरोबर आलेले माजी नगराध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी अनेक निविदा मंजूर करताना त्या जादा दराच्या असल्याबद्दल त्यांनी प्रशासनावर टीका केली. तेव्हा मुख्याधिकारी म्हणून आपला वचक नसल्याचाही आरोप त्यांनी केला. यावर बोलताना आमदार हाळवणकर म्हणाले, नगरपालिकेचा कारभार अशाच प्रकारे गोंधळाचा आणि बेहिशेबी राहिला तर पालिका बदनाम होईलच; शिवाय विविध विकासकामांना आणि नागरिकांच्या सेवा-सुविधांना निधी शिल्लक राहणार नाही. तरी आपल्याकडे असणाऱ्या अधिकाराचा आपण नियमानुसार वापर करावा.
काही नगरसेवक निविदा मंजुरीसाठी दबाव टाकतात. तर काही नगरसेवक अप्रत्यक्षरीत्या मक्तेदार झाले आहेत. याचा गोपनीय अहवाल तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा, ज्यामुळे पालिकेच्या कामकाजाला शिस्तीबरोबर सुसूत्रता येईल, असेही निर्देश यावेळी हाळवणकर यांनी दिले.
अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी, यासाठी बायोमेट्रिक पद्धतीचे यंत्र बसविले; पण त्यात कोणीतरी पाणी टाकून ते बिघडवले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना शिस्त पाहिजे आहे, असे वाटत नाही. तरी मुख्याधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन पालिका इमारतीमध्ये, तसेच शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, मक्तेदारांच्या कामावर फलक लावणे, नागरिकांच्या सेवा-सुविधा तत्परतेने देण्यासाठी नागरिकांची सनद अंमलात आणणे, असे कामकाजातील नियम सक्तीने पाळावेत, अशाही सूचना हाळवणकर यांनी दिल्या.
मुख्याधिकारी पवार यांनी, कामकाज शिस्तबद्ध होण्यासाठी कठोरतेची भूमिका घेऊन कामकाजात आमूलाग्र बदल करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. नगरपालिकेकडे सुरू असलेल्या आणि सुरू होणाऱ्या विविध कामांच्या प्रगतीची छायाचित्रे रेकॉर्डला ठेवून त्याप्रमाणेच बिले अदा केली जातील, असे पवार म्हणाले.
यावेळी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, नगरसेविका माधुरी चव्हाण, रेखा रजपुते, नगरसेवक महादेव गौड, जलअभियंता बापूसाहेब चौध्
ारी, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)


रिंग रोडचे काम शासनामार्फत
नगरपालिकेकडील विशेषत: बांधकाम खात्याकडील कामकाजाबाबत झालेला गोंधळ पाहता शहरात मंजूर झालेल्या रिंग रोडचे काम शासनाच्या सार्वजनिक खात्यामार्फत करून घेण्यात येणार आहे. त्यामुळे बारा कोटींचे रिंग रोडचे काम दर्जेदार व टिकाऊ होईल, असेही यावेळी आमदार हाळवणकर यांनी सांगितले आणि याचप्रमाणे दर्जेदार कामे होण्यासाठी थेट शासनाची यंत्रणा राबविण्यात येईल, असेही त्यांनी अप्रत्यक्षरीत्या सूचित केले.

Web Title: Municipal corporation tree plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.