महापालिकेचे अनुसूचित जातीचे बारा प्रभाग निश्चित, कोणते आहेत हे प्रभाग जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 01:25 PM2022-05-25T13:25:31+5:302022-05-25T13:25:58+5:30
प्रत्येक वॉर्डात तीन उमेदवार असतील, त्यातील एक आरक्षण अनुसूचित जाती प्रवर्गासाठी असेल. लोकसंख्येच्या निकषावर हे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे,
कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने मंगळवारी शहरातील ३१ पैकी १२ प्रभाग अनुसूचित जातीसाठी निश्चित केले. हे आरक्षण दि. ३१ मे रोजी अधिकृतपणे जाहीर केले जाणार आहे. प्रत्येक वॉर्डात तीन उमेदवार असतील, त्यातील एक आरक्षण अनुसूचित जाती प्रवर्गासाठी असेल. लोकसंख्येच्या निकषावर हे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे, असे उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी सांगितले.
कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. सोमवारी सायंकाळी राज्य निवडणूक आयोगाने आरक्षणाचा निश्चितीचा कार्यक्रम जाहीर केला आणि प्रशासनाची तयारी सुरू झाली. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आयोगाच्या सूचनेनुसार ज्या वॉर्डात अनुसूचित जातीची लोकसंख्या जास्त आहे तेथील एक जागा ही त्या प्रवर्गासाठी निश्चित करायची आहे. मंगळवारी महापालिका अधिकाऱ्यांनी अनुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या बारा वॉर्डची यादी तयार केली. बारा वॉर्ड निश्चित केले.
एक वॉर्डातून तीन नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. त्यापैकी एक जागा ही अनुसूचित जाती प्रवर्गासाठी सोडून अन्य दोन जागा खुल्या प्रवर्गासाठी राहणार आहेत. जे बारा वॉर्ड निश्चित केले आहेत, त्यातील सहा ठिकाणी अनुसूचित जाती महिला यांच्यासाठी सोडत पद्धतीने आरक्षण टाकले जाणार आहे. तर एक जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित राहणार आहे. दि. ३१ मे रोजी महिलांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण -
वार्ड क्रमांक पुढील प्रमाणे (अनुसूचित जातीची लोकसंख्या) -
वार्ड क्रमांक ३० (७५१८), वॉर्ड क्रमांक ४ (७०९७), वार्ड क्रमांक १९ (५३७४), वार्ड क्रमांक १ (४२३०), वार्ड क्रमांक ७ (२८२९), वार्ड क्रमांक १३ (३४३५), वार्ड क्रमांक २८ (२९९३), वार्ड क्रमांक ९ (२९२९), वार्ड क्रमांक २१ (२४५७), वार्ड क्रमांक १८ (२५५८), वार्ड क्रमांक ५ (२१२०), वार्ड क्रमांक १५ (२२०८)