अकरा हजार कर्मचाऱ्यांना महापालिका देणार कोविड लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:19 AM2021-01-14T04:19:48+5:302021-01-14T04:19:48+5:30
कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रात सरकारी व खासगी मिळून एकूण ११ हजार ११९ इतक्या आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी पोर्टलवर झालेली ...
कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रात सरकारी व खासगी मिळून एकूण ११ हजार ११९ इतक्या आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी पोर्टलवर झालेली असून, या सर्वांना शनिवारी लसीकरण पहिल्या टप्प्यामध्ये आठ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राच्या ठिकाणी लस टोचण्यात येणार आहे.
कोविड-१९ लसीकरणाच्या नियोजनाबाबत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे देशात दि. १६ जानेवारीपासून कोविड १९ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. लसीकरणाच्या पूर्वतयारीबाबत प्रशासक बलकवडे यांनी टास्कफोर्स बैठकीमध्ये सविस्तर आढावा घेतला.
शासन निर्देशानुसार लसीकरणाच्या नियोजनाबाबत सिटी टास्क फोर्स समितींच्या सदस्यांची प्रशासक बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कोविड लसीकरण अंतिम तयारीबाबत स्लाईड शो द्वारे डॉ. अमोल माने यांनी सादरीकरण केले.
केंद्रावरील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याचे आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ यांनी सांगितले. महापालिकेच्यावतीने १६ जानेवारीच्या लसीकरणाच्या अनुषंगाने सर्व तयारी पूर्ण झाली असून, शासनाकडून प्राप्त होणारी लस शीतसाखळी अबाधित ठेवून नियोजित केंद्रावर लस पोहोचविण्यात यावी असे निर्देश प्रशासक बलकवडे यांनी आरोग्याधिकाऱ्यांंना दिले. यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशा सूचनाही दिल्या.
बैठकीस पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण, उपआयुक्त निखिल मोरे, सहायक आयुक्त संदीप घारगे, जागतिक आरोग्य संघटना प्रतिनिधी डॉ. हेमंत खरनारे, कोल्हापूर वैद्यकीय संघटना अध्यक्ष डॉ. आबासाहेब शिर्के, कोल्हापूर स्त्रीरोग संघटना अध्यक्ष डॉ. मंजुशा पिशवीकर, बालरोग संघटना अध्यक्ष डॉ. कुंभोजकर, निमा अध्यक्ष डॉ. मोकाशी, एकात्मिक बाल विकास सेवा अधिकारी श्रीमती महाडिक, कामगार अधिकरी सुधाकर चल्लावड, लसीकरण अधिकारी डॉ. रूपाली यादव, तसेच वैद्यिकीय अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, डॉ. राजेश औंधकर, डॉ. विजय मुसळे उपस्थित होते.