मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे महापालिकेचे लक्ष

By admin | Published: May 17, 2017 01:19 AM2017-05-17T01:19:40+5:302017-05-17T01:19:40+5:30

नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाची धास्ती : काँग्रेस-राष्ट्रवादीची सावध पावले; भाजपची जोरदार तयारी

Municipal corporation's attention to Chief Minister's visit | मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे महापालिकेचे लक्ष

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे महापालिकेचे लक्ष

Next

शीतल पाटील ।  -लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसमधील दुफळी, विरोधी राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेला अंतर्गत संघर्ष, त्यातून भाजप प्रवेशासाठी लागलेली फिल्डिंग या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगली दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याकडे महापालिकेचे लक्ष लागले असून, वर्षभरानंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी ते भाजप कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात, याची उत्सुकताही आहे.
महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस व विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष पेटला आहे. त्यात महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्याने दोन्ही काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी काही नगरसेवक आतूर झाले आहेत. सत्ताधारी काँग्रेसमध्ये दीड वर्षापासून फूट पडली आहे. उपमहापौर गटाच्या नावाखाली काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी स्वतंत्र चूल मांडली. स्वपक्षीयांच्या कारभाराविरोधात उपमहापौर गटाने मध्यंतरी चांगलीच उचल खाल्ली होती. त्याला माजी आमदार संभाजी पवार यांच्या स्वाभिमानी आघाडीचीही साथ मिळाली. त्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीपेक्षा उपमहापौर गटच विरोधकांची भूमिका पार पाडत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. सध्या महापौर बदलावरून काँग्रेसमध्ये राजकारण सुरू आहे. त्यामुळे पक्षावर नाराजांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. स्थायी समिती सभापती, मागासवर्गीय समिती व प्रभाग समिती चारच्या निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. पक्षाचे नेतृत्व जयश्रीताई पाटील व डॉ. पतंगराव कदम यांच्याकडे असले तरी, निष्ठावंतांची घटती संख्या नेत्यांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे.
विरोधी राष्ट्रवादीतही सारे काही आलबेल राहिलेले नाही. आमदार जयंत पाटील यांची एकहाती पकड असलेल्या राष्ट्रवादी नगरसेवकांतही संघर्ष पेटला आहे. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज व विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील गटात राष्ट्रवादीची विभागणी झाली आहे. विरोधी पक्षनेता निवडीवेळी त्याचा प्रत्यय आला आहे. अजूनही हा संघर्ष संपलेला नाही. त्यात जयंत पाटील यांनी काँग्रेसमधील एका गटाला चुचकारल्याने मिरजेतही नाराजीचा सूर उमटत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार की नाही, हे अद्याप निश्चित नसले तरी, ज्येष्ठ नगरसेवकांनी आतापासूनच आघाडीचे राजकारण सुरू केले आहे. त्याला काहींचा विरोध आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील काही नगरसेवक फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे.
त्यात मिरज पॅटर्नने सवतासुभा मांडत वेगळे अस्तित्व ठेवण्याचा प्रयत्न चालविला आहे. मिरजेतील इद्रिस नायकवडी, सुरेश आवटी, मैनुद्दीन बागवान अशी दिग्गज नेतेमंडळी एकत्र आली आहेत. मिरजेतील एक गट भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा मध्यंतरी जोरात सुरू होती. मिरज पॅटर्नला भाजपमध्ये घेण्यावरूनही पक्षात वादविवाद आहेत.
या सर्व राजकीय पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगली दौऱ्यावर येत आहेत. सध्या तरी त्यांचे सर्व कार्यक्रम शासकीय असले तरी, यावेळी राजकीय चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा अथवा जाहीर सभा नसल्याने पक्षप्रवेशाबाबत साशंकता असली तरी, भाजपच्या काही मंडळींनी मोजक्याच नगरसेवकांना मुख्यमंत्र्यांच्या दरबारी हजर करण्याची तयारी चालविली आहे. वर्षभराने होणाऱ्या महापालिका निवडणुकीची तयारी भाजपने गेल्या दोन महिन्यापासूनच सुरू केली आहे. त्यात फडणवीसही त्यांच्या दौऱ्यात भाजप कार्यकर्त्यांना विजयाचा कानमंत्र देतील. त्याकडे पालिकेतील सत्ताधारी व विरोधी पक्षांचेही लक्ष लागले आहे.


प्रभाग रचनेनंतरच गती
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षबदलाचे वारे जोमाने वाहू लागले आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी काहीजण इच्छुकही आहेत. त्यात मिरजेतील नगरसेवकांचा अधिक समावेश आहे. पण त्यांच्या प्रवेशाला भाजपच्या काही मंडळींचा विरोध आहे. सांगली व कुपवाडमधील काहीजण कुंपणावर आहेत. प्रभाग रचना कशी होते, कोणत्या पक्षातून निवडणूक लढविल्यास ती फायदेशीर ठरेल, याचा विचार करूनच ही कुंपणावरील मंडळी पक्षबदल करणार असल्याचे समजते.

निवडणुकीसाठी रणनीती
गेल्या दोन महिन्यांपासून भाजपने महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. नुकताच कार्यकर्त्यांचा अभ्यासवर्गही झाला. आता २५ मेपासून भाजपने विस्तारक म्हणून नियुक्त केलेले कार्यकर्ते बुथनिहाय जनतेपर्यंत पोहोचणार आहेत. गेल्या चार वर्षातील काँग्रेसचा कारभार, फडणवीस सरकारने आखलेल्या योजना, शासनाची उपलब्धी जनतेपर्यंत पोहोचवून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न भाजपने चालविला आहे.

Web Title: Municipal corporation's attention to Chief Minister's visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.