महापालिकेचे आर्थिक नियोजन बिघडणार
By admin | Published: February 18, 2015 01:32 AM2015-02-18T01:32:03+5:302015-02-18T01:32:03+5:30
महापौर राजीनामा नाट्य : नगरसेवकांच्या महासभेवरील बहिष्काराने प्रशासनापुढे पेच
संतोष पाटील / कोल्हापूर
महापौर तृप्ती माळवी यांनी राजीनामा न दिल्यास काँग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक महासभेवर बहिष्कार टाकणार आहेत. येत्या २८ फेब्रुवारीला वार्षिक आर्थिक नियोजनाच्या मंजुरीसाठी सभा घ्यावी लागणार आहे. सभेपुढील निर्णयावर मंजुरीची मोहर उमटविण्यासाठी सभागृहात किमान २८ नगरसेवकांची उपस्थितीत अनिवार्य आहे. सभेच्या मंजुरीसाठी प्रशासनाने प्रस्ताव ठेवल्यानंतर ९० दिवसांत सभा न झाल्यास आयुक्तांच्या अधिकारात प्रस्तावास मंजुरी दिली जाऊ शकते. या प्रशासकीय पेचामुळे येत्या वर्षातील आर्थिक लेखाजोखाच्या नियोजनासह प्रशासकीय मंजुऱ्या रखडणार असल्याने प्रशासनापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
महापौर तृप्ती माळवी यांनी दोनवेळा राजीनाम्यासाठी बोलाविलेल्या बैठकीत ‘ठेंगा’ दाखविला. महापौर राजीनामा देण्यास तयार नसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. महापौर राजीनामा न देण्यावर ठाम राहिल्यास सभागृहाचे कामकाज होऊ देणार नाही, अशी घोषणा दोन्ही काँग्रेसने केली आहे. कोरमअभावी सभा न झाल्यास वार्षिक आर्थिक आराखडा नियोजनाचे काय होणार, हा प्रश्न प्रशासनास सतावत आहे. सभेअभावी प्रशासकीय खर्चासह विकासकामांना ‘खो’ बसण्याची शक्यता आहे.