नगरसेवकाने मागितली निधीची भिक्षा-महासभेत आयुक्तांसमोर धरला कटोरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 08:45 PM2017-09-19T20:45:00+5:302017-09-19T20:45:05+5:30
कोल्हापूर : प्रभागात विकासकामे होत नाहीत. निधी मागितला तर तो दिला जात नाही. विकासकामांच्या फाईल घेऊन गेलो की अधिकारी ताकतुंबा करतात.
कोल्हापूर : प्रभागात विकासकामे होत नाहीत. निधी मागितला तर तो दिला जात नाही. विकासकामांच्या फाईल घेऊन गेलो की अधिकारी ताकतुंबा करतात. मग आम्ही नगरसेवकांनी जायचे तरी कोठे? असा रोखठोक सवाल उपस्थित करीत कमलाकर भोपळे यांनी मंगळवारी हातात चक्क कटोरा धरून महानगरपालिका सर्वसाधारण सभेत आयुक्तांकडे विकासनिधीची भिक्षा मागितली. अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रकारामुळे आयुक्त डॉ. अभिजित चौधरीही क्षणभर गोंधळून गेले. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर हसिना फरास होत्या.
रस्ता अपघातात दोन भावांचा मृत्यू झाल्याने सभागृहातील वातावरण तापले असतानाच कमलाकर भोपळे यांनी विकास निधीचा मुद्दा उपस्थित केला. आधी त्यांना बोलूच दिले जात नव्हते; त्यामुळे भोपळे संतप्त झाले होते. सभागृहात बोलण्याची संधी मिळताच त्यांनी विकास निधीच्या मुद्द्याकडे आयुक्तांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.सभागृहात भोपळे यांनी अत्यंत उद्विग्नपणे आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, ‘मी वडणगे येथील रहिवासी होतो. शहरात राहायला आलो आणि जनतेने मला महानगरपालिकेवर निवडून दिले. ‘प्रभागाचं सोनं करतो’ असे आश्वासन मी जनतेला निवडणुकीत दिले.
दोन वर्षांत दोन पैशांचा निधी मला मिळालेला नाही. त्यामुळे आता परत वडणगेला जायचा विचार माझ्या मनात आला आहे. निधी मागायला गेलो की तो मिळत नाही. टेंडर निघायची वेळ आली की अधिकारी ताकतुंबा करतात. अमुक कागद आणा, तमुक नकाशा आणा, असे सांगितले जाते. कामे होत नाहीत म्हटल्यावर जनताही नाराज झाली आहे. ‘कामे होत नसतील तर गोट्यांनी खेळा,’ अशा शब्दांत मतदार आमचा अपमान करतात. आता येथे येऊन कोणाबरोबर गोट्या खेळायच्या ते आयुक्तसाहेब, तुम्हीच सांगा. मी तुमच्याकडे आज कटोरा घेऊन आलोय. त्यात काहीतरी निधी टाका. नाही तर आम्ही दिलेल्या सगळ्या फाईल्स फाडून टाका.’
भोपळे यांनी व्यक्त केलेल्या भावनांशी सर्वच सदस्यांनी सहमती दर्शविली. भूपाल शेटे, सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, रूपाराणी निकम, मुरलीधर जाधव यांनी विकास निधी लवकरात लवकर सोडण्याची मागणी केली. त्यावर शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी गेल्या वर्षी अंदाजपत्रकात ५९६ कामे धरण्यात आली होती; त्यांपैकी २९१ कामे २०१५-१६ मध्ये मंजूर झाली; तर १६१ कामे २०१६-१७ मध्ये मंजूर झाल्याची त्यांनी माहिती दिली. या वर्षीची कामे आता पावसाळा संपताच सुरू करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
शौचालयाला साडी लावली
प्रभागातील शौचालयास दरवाजे नाहीत. ते मोडून पडले आहेत. दरवाजे लावा म्हणून किती दिवस सांगतोय; पण कोणीही लक्ष देत नाहीत. शेवटी एका महिलेने गैरसोय होतेय म्हटल्यावर दरवाजा म्हणून चक्क साडी लावली... महानगरपालिकेची इतकी वाईट अवस्था झाली आहे का? अशी विचारणा कमलाकर भोपळे यांनी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे केली, तेव्हा आयुक्तही निरुत्तर झाले.