मनपा, जि. प. निवडणुका स्वबळावर

By admin | Published: June 6, 2015 12:31 AM2015-06-06T00:31:21+5:302015-06-06T00:54:05+5:30

सरवदे यांची घोषणा : आठवले गट महायुतीतून बाहेर

Municipal, Dist. Par. Elections on self | मनपा, जि. प. निवडणुका स्वबळावर

मनपा, जि. प. निवडणुका स्वबळावर

Next

कोल्हापूर : भाजप सरकारने खासदार रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रिपद दिले नाही़ सत्तेमध्येही दहा टक्के वाटा दिलेला नाही; त्यामुळे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘आरपीआय’ स्वबळावर लढेल़़, अशी घोषणा रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांनी शुक्रवारी केली़
पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा़ शहाजी कांबळे यांच्या ४९ व्या वाढदिवसानिमित्त गौरव समितीतर्फे शाहू स्मारक भवनात सन्मान परिषद झाली. यावेळी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ़ कृष्णा किरवले, प्राचार्य डॉ़ हरीश भालेराव, प्रा़ विजय काळेबाग, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे उपस्थित होते. प्रा़ कांबळे यांचा राजर्षी शाहूंचा पुतळा व फेटा देऊन गौरव केला़ परिषदेपूर्वी पक्षाच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील पश्चिम महाराष्ट्र संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सरवदे यांच्या हस्ते झाले़
सरवदे म्हणाले, गेली पंधरा वर्षे कॉँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहून निराशा पदरी आली़ आता भाजपनेही तीच री ओढली आहे़ येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका लढविण्यासाठी पक्षाचे उमेदवार उभे करण्याचे आदेश राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी दिले आहेत़ शहाजी कांबळे यांनी पश्चिम महाराष्ट्रात रिपलिब्कन चळवळ रुजविण्याचे काम केले़
प्राचार्य डॉ़ हरीश भालेराव म्हणाले, बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये संविधानातील बदल, आरक्षणाला विरोध करण्यासाठी गुप्त डाव सुरू आहेत़ डॉ़ आंबेडकर यांच्या वैचारिकतेचा पुरस्कार करणारे गोविंद पानसरे व डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांची हत्या या घटना डोळसपणे पाहिल्या पाहिजेत़
डॉ़ कृष्णा किरवले म्हणाले, आंबेडकरी प्रवाहाचा गैरफायदा घेत काहींनी आरपीआय गटांना बदनाम करण्याचे ठरविले आहे़ आंबेडकरी चळवळीपुढे डावे-उजवे यांचे आव्हान तर आहेच़, याशिवाय आंबेडकरी चळवळीतीलच काही प्रवाह गुप्तपणे आरपीआय गटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कलुषित करीत आहेत़
प्रा. विजय काळेबाग, डॉ़ अनिल माने, बहुजन दलित महासंघाचे संस्थापक बबन सावंत, संजय लोखंडे, रूपा वायंदडे, प्रा़ सुरेखा कांबळे, आदींची भाषणे झाली़ यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य शामप्रसाद कांबळे, बी़ के. कांबळे, सचिव मंगलराव माळगे, अशोक सरवदे, आदी उपस्थित होते़ शहाजी कुरणे यांनी सूत्रसंचालन केले़ सुखदेव बुद्ध्याळकर यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)

तिथून चळवळ
नामांतर, ‘रिडल्स’मधील लढाऊ आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचे काम प्रस्थापित साहित्यिकांनी आणि राजकारण्यांनी केले होते; पण या कार्यकर्त्यांचा विचार नेटाने पुढे नेण्याचा निर्धार केला अन् तिथून चळवळ सुरू झाली, असे प्रा़ शहाजी कांबळे म्हणाले.

Web Title: Municipal, Dist. Par. Elections on self

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.