महापालिका निवडणुकीची प्रक्रिया आजपासून; ३१ प्रभागांच्या सीमा बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 11:39 AM2022-02-01T11:39:19+5:302022-02-01T11:39:41+5:30

सूचना आणि हरकती १४ फेब्रुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत ताराराणी गार्डन येथील मुख्य निवडणूक कार्यालयात दाखल करता येणार

Municipal election process from today Ward composition will be published in this place | महापालिका निवडणुकीची प्रक्रिया आजपासून; ३१ प्रभागांच्या सीमा बदलणार

महापालिका निवडणुकीची प्रक्रिया आजपासून; ३१ प्रभागांच्या सीमा बदलणार

Next

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीची प्रत्यक्ष प्रक्रिया आज, मंगळवारपासून (दि. १ फेब्रुवारी) राज्य निवडणूक आयोगामार्फत सुरू होत आहे. प्रारूप प्रभागरचना शहरातील पाच ठिकाणी आज सकाळी दहा वाजता प्रसिद्ध होणार आहे. सायंकाळी पाच वाजता www.kolhapurcorporation.gov.in या वेबसाइटवरही प्रभागरचना पाहता येणार आहे.

यावर सूचना आणि हरकती १४ फेब्रुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत ताराराणी गार्डन येथील मुख्य निवडणूक कार्यालयात दाखल करता येणार आहे. ३० प्रभागांत प्रत्येकी तीन सदस्य आणि एका प्रभागात दोन असे ९२ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. प्रथमच त्रिसदस्यीय पद्धतीने ही निवडणूक होणार आहे.

महापालिका सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबर २०२० ला संपली आहे. तेव्हापासून महापालिकेत आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे याच प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. कोरोना व ओबीसी आरक्षणाचा तिढा निर्माण झाल्यामुळे ही निवडणूक लांबणीवर पडली होती. ती आता एप्रिल अखेरीस किंवा मे च्या पहिल्या आठवड्यात घेण्याच्या हालचाली निवडणूक आयोगाकडून सुरू झाल्या आहेत. त्यातील पहिला टप्पा म्हणून नव्याने प्रभाग रचना जाहीर होत आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तरी राजकीय पातळीवर अजून हालचाली सुरू झालेल्या नाहीत. महापालिका निवडणुकीच्या अगोदर कदाचित कोल्हापूर उत्तरची निवडणूक होणार आहे. मावळत्या सभागृहात दोन्ही काँग्रेसची सत्ता होती व त्या सत्तेला शिवसेनेचे पाठबळ होते. आताही राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये हे तिन्ही पक्ष एकत्रित सत्तेत असले तरी एकूण इच्छुकांची गर्दी पाहता तिन्ही पक्ष स्वतंत्र लढणार आहेत. त्यातही दोन्ही काँग्रेसमध्ये अंतर्गत समझोता आहे. आपापल्या चिन्हावर लढून नंतर सत्तेसाठी एकत्र यावे असा सर्वांच्या सोयीचा फॉर्म्युला या निवडणुकीतही वापरला जाऊ शकतो.

३१ प्रभागांच्या सीमा बदलणार

यावेळी नवीन एक ते ३१ प्रभागांच्या भौगोलिक सीमाही कळणार आहेत. यावर १४ फेब्रुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत सुटीचा दिवस वगळून कार्यालयीन वेळेत सूचना, हरकती स्वीकारण्यात येणार आहे. हरकत आणि सूचना दाखल करताना अर्जदारांनी लेखी अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जावर नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे. हरकत घेतलेल्यांना सुनावणीस उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका निवडणूक प्रशासनातर्फे देण्यात आली.

येथे पाहायला मिळणार प्रभागरचना

महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिकेच्या गांधी मैदानाजवळील बाळासाहेब खराडे पॅव्हेलियन हॉल, केशवराव भोसले नाट्यगृह, राजारामपुरीतील जगदाळे हॉल, विवेकानंद कॉलेजजवळील नागाळा पार्क हॉल, सासणे मैदानातील मुख्य निवडणूक कार्यालय येथे प्रभागरचना महापालिका निवडणूक प्रशासनातर्फे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Web Title: Municipal election process from today Ward composition will be published in this place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.