जिल्ह्यातील नेत्यांच्या उपस्थितीने पालिका निवडणुकीचे रणशिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:16 AM2021-06-17T04:16:26+5:302021-06-17T04:16:26+5:30

गणपती कोळी कुरुंदवाड : शहरातील भाजपा नेते आणि पालिकेतील विरोधी आघाडीचे प्रमुख रामचंद्र डांगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ...

Municipal election trumpet in the presence of district leaders | जिल्ह्यातील नेत्यांच्या उपस्थितीने पालिका निवडणुकीचे रणशिंग

जिल्ह्यातील नेत्यांच्या उपस्थितीने पालिका निवडणुकीचे रणशिंग

Next

गणपती कोळी

कुरुंदवाड : शहरातील भाजपा नेते आणि पालिकेतील विरोधी आघाडीचे प्रमुख रामचंद्र डांगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार अमल महाडिक, भाजपा जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्यासह तालुका, जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी उपस्थिती दाखवून पालिका निवडणुकीचे एकप्रकारे रणशिंगच फुंकले आहे. त्यामुळे डांगे यांना बळ मिळाले असून पालिका निवडणुकीत सत्ताधारी जयराम पाटील यांच्याविरोधात आघाडीतील प्रमुख नेत्यांचे चेहरे स्पष्ट होत असल्याची चर्चा रंगली आहे.

शहरात माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील, नगराध्यक्ष जयराम पाटील गट व माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे असे प्रमुख तीन गट आहेत. शहरात तीनही गटनेत्यांचे वर्चस्व असल्याने पालिका इतिहासात कोणत्याही गटाला पूर्ण बहुमत मिळाले नाही. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण होते.

पालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे, तर भाजपा विरोधात आहे. वर्षाखेरीस पालिकेच्या निवडणुका असून पालिका निवडणुकीत डांगे यांना बाजूला ठेवून राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेस एकत्र येण्याबाबत पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मदतीने नगराध्यक्ष पाटील यांची मोर्चेबांधणी सुरू आहे.

नगराध्यक्ष पाटील यांनी गत विधानपरिषद आणि नुकत्याच झालेल्या गोकुळच्या निवडणुकीत महादेवराव महाडिक यांना, तर प्रत्येक निवडणुकीत माजी खासदार शेट्टी यांना थेट विरोध आणि शहरातील विकास कामाबाबत यड्रावकर गट सत्तेत असतानाही मंत्री यड्रावकरांबाबत दुजाभाव करत असल्याने तीनही नेते नगराध्यक्ष पाटील यांच्यावर नाराज आहेत.

........

राजकीय चर्चा रंगली

गेल्या पाच वर्षात तालुका, जिल्हा पातळीवरील निवडणुकीत डांगे हे महाडिक व शेट्टी यांच्या पाठीशी राहिले आहेत. शिवाय डांगे नगराध्यक्ष पाटील यांच्याविरोधात आक्रमक असल्याने पालिका निवडणुकीत या नेत्यांकडून पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. त्यातच डांगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नेत्यांनी हजेरी लावल्याने पालिका निवडणुकीचे रणशिंग वाजत असून सत्ताधारी-विरोधकांचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे डांगे यांच्या वाढदिवसानिमित्ताने राजकीय चर्चा रंगली आहे.

Web Title: Municipal election trumpet in the presence of district leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.