महापालिकेची निवडणूक १५ एप्रिलदरम्यान होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 04:48 PM2021-02-03T16:48:40+5:302021-02-03T16:51:06+5:30

Muncipal Corporation Election Kolhapur- कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे तसेच राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी पूर्वतयारीचे निर्देश दिल्यामुळे महानगरपालिकांच्या पुढे ढकलण्यात आलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूकही आता एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात होण्याची दाट शक्यता आहे. प्रारूप प्रभागरचना व आरक्षणे निश्चित झाल्यानंतर आता प्रारूप मतदारयाद्यांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने महापालिकेत त्यादृष्टीने लगबग सुरू झाली आहे.

Municipal elections are likely to be held on April 15 | महापालिकेची निवडणूक १५ एप्रिलदरम्यान होण्याची शक्यता

महापालिकेची निवडणूक १५ एप्रिलदरम्यान होण्याची शक्यता

Next
ठळक मुद्देमहापालिकेची निवडणूक १५ एप्रिलदरम्यान होण्याची शक्यता प्रारूप मतदारयाद्यांचा कार्यक्रम जाहीर : महापालिकेत लगबग सुरू

भारत चव्हाण 

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे तसेच राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी पूर्वतयारीचे निर्देश दिल्यामुळे महानगरपालिकांच्या पुढे ढकलण्यात आलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूकही आता एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात होण्याची दाट शक्यता आहे. प्रारूप प्रभागरचना व आरक्षणे निश्चित झाल्यानंतर आता प्रारूप मतदारयाद्यांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने महापालिकेत त्यादृष्टीने लगबग सुरू झाली आहे.

महानगरपालिकेची निवडणूक केव्हा होणार याची उत्सुकता ताणली गेली असतानाच राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेचे पुढचे पाऊल म्हणून प्रारूप तसेच अंतिम मतदारयादी तयार करण्याचे निर्देश दिले. निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व १५ जानेवारी २०२१रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या या निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. दि. १६ फेब्रुवारी ते १२ मार्च या कालावधीत मतदारयाद्या तयार करण्याचे काम सुरू होणार असून त्यानंतर साधारण एक महिन्याने म्हणजेच एप्रिलच्या १५ तारखेच्या दरम्यान निवडणूक घेतली जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

प्रभागनिहाय मतदारयाद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदारयाद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जाणार आहेत. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरुस्ती करणे, आदी स्वरूपाची कार्यवाही केली जाणार नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदारयाद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे, आदींसंदर्भातील दुरुस्त्या करण्यात येणार आहेत.

- असा आहे मतदारयादीचा कार्यक्रम -

  • दि. १६ फेब्रुवारी रोजी प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध होणार.
  •  दि. २३ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील.
  •  दि. ३ मार्च रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध होतील.
  • दि. ८ मार्च रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध होईल.
  • दि. १२ मार्च रोजी मतदान केंद्रनिहाय मतदारयाद्या प्रसिद्ध होतील.


राजकीय पक्षांची जोरदार तयारी-

निवडणूक १५ एप्रिलच्या दरम्यान होणार हे आता स्पष्ट झाल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रभागाचे सर्वेक्षण पूर्ण होत आले आहे. निवडून येणाऱ्या सक्षम उमेदवारांचा शोधही आता पूर्ण झाला आहे. फक्त त्यांना आपल्याकडे खेचण्याची मात्र चढाओढ सुरू झाली आहे. हमखास निवडून येणाऱ्या उमेदवारांना राजकीय पक्षाचे नेते ह्यआमची उमेदवारी घ्या, पुढचे आम्ही बघतोह्ण, असे सांगितले जात आहे.

शिवसेनेचाही आता साम-दाम-दंड भेद

कट्टर शिवसैनिकांची फौज, पक्षाच्या विचारधारेला बांधील असलेला मतदार असूनही शिवसेनेचे उमेदवार ऐन मतदानाच्या दोन दिवस आधी मागे पडतात. हा गेल्या अनेक निवडणुकीतील अनुभव लक्षात घेऊन यावेळी शिवसेनेने ह्यसाम-दाम-दंड-भेदह्ण या आयुधांचा वापर करण्याचे ठरविले असून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मंगळवारी त्याचे सूतोवाच केले. राज्यात सत्ता असल्याने शिवसेनाही आता मागे राहणार नाही, असे दिसते.

 भाजपची भिस्त ताराराणीच्या ताकदीवर

देशात सत्तेत असणाऱ्या भाजपची ताकद कोल्हापूर शहरात तुलनेने कमी आहे. त्यामुळे त्यांची सगळी भिस्त ही त्यांची आघाडी असलेल्या ताराराणी आघाडीच्या ताकदीवर असणार आहे. ताराराणी आघाडीसाठी महादेवराव महाडिक, प्रा. जयंत पाटील, सुहास लटोरे, सत्यजित कदम, सुनील कदम, तर भाजपसाठी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, माजी खासदार धनंजय महाडिक, अमल महाडिक, राहुल चिकोडे व्यूहरचना आखत आहेत. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रमुख मार्गदर्शक व निवडणुकीतील रसद पुरविण्याच्या भूमिकेत आहेत.

कॉंग्रेस-राष्ट्रवादीत चढाओढ

गेल्या दहा वर्षांपासून एकत्र असलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीत सभागृहातील पहिल्या स्थानासाठी चढाओढ सुरू झाली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्वतंत्र लढायचे, पण प्रचारादरम्यान एकमेकांवर टीका करायची नाही, असे ठरवून टाकले आहे. दोन्ही पक्षांचे टीकेचे लक्ष्य हे भाजप असले तरी सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्याचे एकमेकांविरुद्धच प्रयत्न होतील, असा एकंदरीत रागरंग आहे.

Web Title: Municipal elections are likely to be held on April 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.