महापालिका निवडणूक : राज्य निवडणूक आयोगाकडे नजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 02:47 PM2020-10-05T14:47:53+5:302020-10-05T14:49:37+5:30
Muncipal Corporation , kolhapur, elecation कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार महापालिका प्रशासनाने सर्व माहिती संकलित करून तयार ठेवली आहे. यामध्ये गेल्या तीन निवडणुकांतील आरक्षणाच्या माहितीचा समावेश आहे. पुढील प्रक्रियेसाठी प्रशासन राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांच्या प्रतीक्षेत आहे.
कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार महापालिका प्रशासनाने सर्व माहिती संकलित करून तयार ठेवली आहे. यामध्ये गेल्या तीन निवडणुकांतील आरक्षणाच्या माहितीचा समावेश आहे. पुढील प्रक्रियेसाठी प्रशासन राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांच्या प्रतीक्षेत आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबर रोजी पूर्ण होत आहे. कोरोनामुळे निवडणूक पुढे ढकलली जाणार यात शंका नाही. मात्र निवडणुकीच्या पूर्वीची कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने दीड महिन्यापूर्वी महापालिकेच्या प्रशासनाला दिले आहे.
त्यानुसार आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे यांच्याकडे राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार माहिती तयार करण्याचे आदेश दिले. यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली घरफाळा अधीक्षक विजय वणकुद्रे, सुरेश शिंदे, सचिन देवाडकर यांनी आतापर्यंत दिलेले सर्व कामकाज पूर्ण केले आहे.
गेल्या तीन निवडणुकांचा अभ्यास
महापालिकेच्या २००५, २०१० आणि २०१५ या निवडणुकांमध्ये किती प्रभाग होते, आरक्षण काय होते, एका प्रभागाची किती लोकसंख्या होती, तसेच २०२० च्या निवडणुकीतील आरक्षण यांची सर्व माहिती प्राथमिक स्वरूपात तयार केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने मागणी केल्यानंतर ती पाठवली जाणार आहे.
कोरोना आटोक्यात आणण्यास प्रधान्य
कोरोनामुळे प्रत्येक अधिकाऱ्याकडे तीन ते चार विभागांची जबाबदारी आहे. तसेच काही अधिकारी आजारी आहेत. अशा स्थितीतही राज्य निवडणूक आयोगाने पाठवलेल्या पत्रानुसार आत्तापर्यंतची सर्व माहिती तयार ठेवली आहे. सध्या कोरोना आटोक्यात आणणे यालाच प्रशासनाने प्राधान्य दिले आहे.
प्रशासकाचा कालावधी नेमका किती
महापालिकेवर १५ नोव्हेंबरनंतर प्रशासक नियुक्त होणार आहे. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडेच सर्व अधिकार असणार आहेत. कोरोनामुळे निवडणूक काही महिने पुढे ढकलण्यात येणार आहे. तसे संकेतही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी दिले आहेत. कोरोनाचे संकट आणखी किती दिवस राहणार त्यावर सर्व काही अवलंबून आहे. परिणामी नेमके किती दिवस महापालिकेवर प्रशासक राहणार, याचा अंदाज सध्या तरी बांधणे शक्य नाही.