हद्दवाढीनंतरच महापालिका निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:58 AM2021-01-13T04:58:59+5:302021-01-13T04:58:59+5:30
कोल्हापूर : पहिली हद्दवाढ, नंतर महापालिकेची निवडणूक, अशी भूमिका हद्दवाढ समर्थक कृती समितीच्या वतीने घेतली आहे. हद्दवाढीसाठी आता माघार ...
कोल्हापूर : पहिली हद्दवाढ, नंतर महापालिकेची निवडणूक, अशी भूमिका हद्दवाढ समर्थक कृती समितीच्या वतीने घेतली आहे. हद्दवाढीसाठी आता माघार नाही, आरपारची लढाई करण्याचा निर्धारही करण्यात आला. अडवे येणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय झाला.
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेला हद्दवाढीचा नव्याने प्रस्ताव देण्याची सूचना केल्याने हद्दवाढ समर्थक कृती समिती कार्यन्वित झाली आहे. पुढील लढ्याच्या नियोजनासाठी रविवारी महाराणा प्रताप चौकातील माजी महापौर आर.के. पोवार यांच्या कार्यालयात हद्दवाढ समर्थक कृती समितीची राष्ट्रवादीचे अनिल घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक झाली.
माजी नगरसेवक बाबा पार्टे म्हणाले, जनता नव्हे तर लोकप्रतिनिधी कमी पडत आहेत. जिल्ह्यावर राज्य करा; पण हद्दवाढ करा. तीन वर्षांसाठी प्राधिकरणाची नियुक्ती केली असल्याचे सांगितल्यामुळेच आंदोलन थांबवले होते. हद्दवाढ होत नाही तोपर्यंत आता माघार नाही. महापालिकेचा निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलावा. शिवसेनेचे किशोर घाटगे म्हणाले, राजकीय नेते खमके असल्यामुळेच पुण्याची २० पेक्षा जास्त वेळ हद्दवाढ झाली. कोल्हापूरची हद्द मात्र, तेवढीच आहे. ग्रामीण आणि शहरात वेगवेगळी भूमिका घेणाऱ्या नेत्यांना जागा दाखवावी लागेल.
कोण काय म्हणाले...
माणिक मंडलिक : हद्दवाढीसाठी आता मागे हटायचे नाही, ताकदीने लढ सुरू ठेवू.
माजी महापौर मारुतराव कातवरे : शहरात राहयाचे आणि हद्दवाढ नको हे खपवून घेणार नाही.
दुर्गेश लिंग्रस : आडवे येणाऱ्या लोकप्रतिनिधीवर बहिष्कार
सचिन तोडकर : हद्दवाढीचा प्रस्ताव होत नाही तोपर्यंत महापालिका निवडणुकीवरच बाहिष्कार घालू.
ॲड. बाबा इंदूलकर : शरद पवार यांनी ठरवले तर गुढीपाडव्यापर्यंत हद्दवाढ, जिल्हा परिषदेची एनओसी घेण्याची जबाबदारी नेत्यांची.
चौकट
४२ गावे, तीन एमआयडीसह हद्दवाढ झाली पाहिजे
कॉमन संघटनेचे ॲड. बाबा इंदूलकर म्हणाले, ४२ गावे, गोकुळ शिरगाव, शिरोली आणि फाइव्ह स्टार औद्योगिक वसाहतीसह हद्दवाढी झाली पाहिजे. शनिवार दि. १६ पर्यंत तसा प्रस्ताव पाठविण्याची मागणी आज, सोमवारी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना भेटून करणार आहे.
चौकट
दक्षिणमधील तत्कालीन आमदारामुळेच हद्दवाढीला ‘खो’
अनिल घाटगे म्हणाले, दक्षिणमधील तत्कालीन आमदारामुळेच हद्दवाढीला विरोध केल्यामुळेच चंद्रकांत पाटील यांनी हद्दवाढीचा निर्णय मागे घेतला. प्राधिकरणामुळे तोंड भाजून निघाल्याने ग्रामीण जनता आता विरोध करणार नाही. पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेऊन लोकांच्या भावाना सांगू. हद्दवाढीनंतरच महापालिकेची निवडणूक घेण्याची मागणी करू.
फोटो : १००१२०२१ केएमसी हद्दवाढ बैठक
ओळी : कोल्हापूर हद्दवाढीच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी हद्दवाढ समर्थक कृती समितीच्या वतीने रविवारी तातडीची बैठक घेण्यात आली. यावेळी ॲड. बाबा इंदूलकर, अनिल घाटगे, बाबा पार्टे, सचिन तोडकर, किशोर घाटगे, मारुतराव कातवरे, अशोक भंडारे आदी उपस्थित होते.