महापालिका निवडणूक एप्रिलमध्ये शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:48 AM2020-12-17T04:48:36+5:302020-12-17T04:48:36+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. निवडणूक आयोगाने ...
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. निवडणूक आयोगाने ज्या गतीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, ती पाहता तीन-चार महिन्यांत ही निवडणूक होईल, असे सांगण्यात येते. प्रभागरचना व आरक्षण सोडत किती वादग्रस्त होते, यावर निवडणूक प्रक्रिया नक्की कधी सुरू होणार, हे निश्चित होणार आहे.
महानगरपालिकेच्या सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबरला संपली असून आता सगळा कारभार प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हाती आहे. सभागृहाची मुदत संपण्यापूर्वीच आयोगाने निवडणुकीची तयारी करण्याबाबत कळविले होते. कोविडच्या पार्श्वभूमीवर गर्दी होणार नाही, अशा प्रकारची कार्यालयीन कामे पालिका प्रशासनाने आटोपली आहेत. आता प्रत्यक्ष आरक्षण सोडत काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महापालिकेवरील प्रशासकांची नियुक्ती ही सहा महिन्यांकरिता आहे. त्यांची मुदत १५ मेपर्यंत असल्याने तत्पूर्वी नवीन सभागृह अस्तित्वात येणे आवश्यक आहे.
१. महापालिकेची प्रभागरचना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली आहे. त्यावर मोठ्या प्रमाणावर हरकती येऊ शकतात. त्यांची सुनावणी घ्यावी लागते. त्यामुळे यासाठी किती कालावधी लागतो यावरच निवडणूक कधी लागणार हे ठरणार आहे. ही प्रक्रिया मुदतीत झाली तर निवडणूक मार्चअखेरीस होऊ शकते.
२. प्रभागरचना व आरक्षण सोडत यावर न्यायालयीन वाद निर्माण झाल्यास प्रक्रिया रेंगाळते. या दोन्ही प्रक्रिया फारशा वादग्रस्त न झाल्यास निवडणूक लवकर जाहीर होऊ शकते.
३. अंतिम प्रभागरचनेला जोपर्यंत मंजुरी मिळत नाही तोपर्यंत निवडणूक कार्यक्रम जाहीर करता येत नाही. निवडणूक कार्यक्रम किमान ३० दिवसांचा असतो. त्यामुळे मार्चच्या पहिल्या आठवड्यात तो सुरू झाल्यास प्रत्यक्ष निवडणूक एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते, असे निवडणूक विभागातील जाणकारांचे मत आहे.