महापालिका अभियांत्रिकी विभागच कमकुवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:27 AM2021-09-06T04:27:37+5:302021-09-06T04:27:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : एखाद्या संस्थेचा अभियांत्रिकी विभाग जितका सक्षम तितका विकास कामांचा दर्जा श्रेष्ठ असतो; परंतु अकराशे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : एखाद्या संस्थेचा अभियांत्रिकी विभाग जितका सक्षम तितका विकास कामांचा दर्जा श्रेष्ठ असतो; परंतु अकराशे कोटींचे वार्षिक अंदाजपत्रक असलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेचा अभियांत्रिकी विभागच कमकुवत झाला असून, केवळ अभियंत्यांच्या रिक्त जागांमुळे फसवेगिरी करणाऱ्या खासगी सल्लागारांचे सहकार्य घेण्याची दुर्दैवी वेळ प्रशासनावर आली आहे. गेली अनेक वर्षे अभियंत्यांची रिक्त पदे भरली नसल्याने केवळ वेळ मारून नेण्याचे काम महापालिकेत सुरू आहे.
महापालिकेतील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कार्यकारी अभियंता, उपशहर अभियंता, सहायक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांची १५ पदे सध्या रिक्त आहेत. पाणीपुरवठा व ड्रेनेज विभागाकडे ३४ अभियंता पदे मंजूर असून, केवळ आठ अभियंत्यांवर या विभागाचे कामकाज सुरू आहे. विद्युत विभागाकडे सहा अभियंत्यांची आवश्यकता असताना तेथे केवळ एका कनिष्ठ अभियंत्यांवर संपूर्ण शहरावर प्रकाश पाडण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे.
महापालिकेतील कार्यकारी अभियंता व मुख्य जल अभियंता ही पदे प्रतिनियुक्तीवर शासनाकडून भरली जातात; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कार्यकारी अभियंता गेल्या अनेक वर्षांत टिकलेले नाहीत. येथे हजर होऊन दोन-चार महिन्यांतच हे अधिकारी बदली करून घेतात किंवा दीर्घ मुदतीच्या रजेवर जातात, असा अनुभव आहे. सुमारे साडेपाच लाख लोकसंख्या असलेल्या शहराला पाणी देण्याची जबाबदारी एक मुख्य जलअभियंता यांच्यासह केवळ आठ कनिष्ठ अभियंते पार पाडत आहेत. सध्या कोल्हापूर शहरासाठी ४८५ कोटींची काळम्मावाडी थेट पाणीपुरवठा योजना राबविली जात असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यास पाणीपुरवठ्याकडे सक्षम अभियंते नाहीत. ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयाचे उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना नेहमीचे काम करून थेट पाइपलाइन योजनेवर लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे.
ड्रेनेज विभागाची अशीच अवस्था आहे. अमृत योजनेची १७४ कोटींची कामे शहरात सुरू आहेत, त्यावर लक्ष द्यायला पूर्ण वेळ अभियंते नाहीत. त्याचा परिणाम कामे रेंगाळण्यात झाला आहे. अमृतच्या कामांची मुदत संपून एक वर्ष पूर्ण होत आले तरी केवळ अभियंत्यांअभावी पन्नास टक्केही कामे पूर्ण झालेली नाहीत, इतकी वाईट परिस्थिती या कामांची झाली आहे.
नगररचना विभागात अभियांत्रिकी संवर्गातील भूमापक, अनुरेखक, आरेखक ही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे भूमापकाअभावी इमारत बांधकाम करणाऱ्यांना बरीच प्रतीक्षा करावी लागते.
प्रकल्प विभागावर प्रचंड ताण-
सार्वजनिक बांधकाम विभागाकडील प्रकल्प विभाग हा अत्यंत महत्त्वाचा विभाग असून, पीपीपी, बीओटी तत्त्वावरील प्रकल्प, शासन अनुदानातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प, शासन अनुदानातील विविध कामे, वाहतूकविषयक कामे प्रकल्प विभागामार्फत केली जातात. या विभागात कनिष्ठ अभियंत्यांची नऊ, सहायक अभियंता तीन, उपशहर अभियंता दोन अशी पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रकल्प विभाग पंगू झाला आहे.
वाहतूक विभागाचे काम प्रभारींवर -
शहरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे, त्यासाठी आवश्यक सुविधा देण्याकरिता वाहतूक विभाग कार्यरत आहे. या विभागाला एक सहायक अभियंता, दोन कनिष्ठ अभियंता यांची आवश्यकता आहे. तरीही त्याकडे फारसे कोणी लक्ष दिलेले नाही. अन्य अभियंत्यांवर ही कामे सोपविण्यात आल्यामुळे ठळक काम होताना दिसत नाही.