पटसंख्या वाढीसाठी महापालिका मैदानात
By admin | Published: June 5, 2015 11:49 PM2015-06-05T23:49:34+5:302015-06-06T00:24:21+5:30
प्राथमिक शिक्षण मंडळ सज्ज : शाळा प्रवेशोत्सव सप्ताहाचे सोमवारपासून आयोजन--शाळेची लगबग
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या शाळांची स्थिती सध्या सुधारत आहे. दर्जेदार शिक्षणासोबत आता पटसंख्या वाढीसाठी प्राथमिक शिक्षण मंडळ सज्ज झाले आहे. ‘महानगरपालिका शाळा प्रवेशोत्सव सप्ताह’ सोमवार (दि. ८) पासून राबविण्यात येणार आहे. सप्ताहात शाळा परिसरात रॅली, शहरातून महारॅली, पालक भेट अशा उपक्रमांचे नियोजन केले असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे सभापती संजय मोहिते व प्रभारी प्रशासनाधिकारी प्रतिभा सुर्वे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
सभापती मोहिते म्हणाले, महापालिका शाळांची पटसंख्या वाढविणे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, त्यांची उपस्थिती वाढविणे, स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासह अध्ययन-अध्यापन प्रक्रिया आनंददायी करणे, या उद्देशाने शाळा प्रवेशोत्सव सप्ताह सोमवारपासून १३ जूनपर्यंत राबविण्यात येणार आहे.
सप्ताहाची सुरुवात सोमवारी सकाळी आठ वाजता शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, नगरसेवक, महिला बचत गट यांच्या सभेने होईल. त्यानंतर शाळा परिसरातून रॅली काढण्यात येईल. महापालिकेच्या शाळांबाबत जनजागृती करण्यासाठी मंगळवारी (दि. ९) सकाळी नऊ वाजता शहरातून महारॅली काढण्यात येणार आहे. महापालिका, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, शिक्षण मंडळाची इमारत असा रॅलीचा मार्ग आहे. यात महापालिका आयुक्त, अधिकारी, नगरसेवक, शिक्षक व कर्मचारी सहभागी होतील. रॅलीत पथनाट्ये, लेझीम आणि झांजपथक असणार आहे.
रॅलीद्वारे पालकांना प्रवेशाबाबत आवाहन केले जाणार आहे. प्रभारी प्रशासनाधिकारी सुर्वे म्हणाल्या, शाळापातळीवर बुधवार (दि. १०) पासून पात्र विद्यार्थी-पालक भेट, माता-पालकांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम, यशस्वी माजी विद्यार्थ्यांचा सत्कार, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, शाळा सुशोभीकरण व वर्गसजावट उपक्रम राबविण्यात येतील.
प्रवेश दिंडी काढून १५ जूनला नवविद्यार्थ्यांचे स्वागत केले जाईल. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाईल. पत्रकार परिषदेस मंडळाचे सदस्य भरत रसाळे, समीर घोरपडे, कनिष्ठ प्रशासनाधिकारी आर. बी. रावळ, पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, मोहन सरवळकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना बूट देण्याचे नियोजन
महापालिकेच्या शाळांकडे विद्यार्थी यावेत, यासाठी दोन वर्षांपूर्वी गणवेशात बदल केला. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना टाय देण्यात आले. यंदा विद्यार्थ्यांना बूट देण्याचे नियोजन असल्याचे सभापती मोहिते यांनी सांगितले. ते म्हणाले, याबाबत शहरातील विविध सामाजिक संस्था, व्यक्तींशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे.