‘उत्तरेश्वर’मधील महापालिकेचा हॉल बेवारस स्थितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:09 AM2021-08-02T04:09:27+5:302021-08-02T04:09:27+5:30
कोल्हापूर : उत्तरेश्वर पेठ येथील महानगरपालिका प्रशासनाच्या मालकीचा गणपतराव सदाशिव माने सार्वजनिक हॉल गेल्या २०-२२ वर्षांपासून अत्यंत दुरवस्थेत असून ...
कोल्हापूर : उत्तरेश्वर पेठ येथील महानगरपालिका प्रशासनाच्या मालकीचा गणपतराव सदाशिव माने सार्वजनिक हॉल गेल्या २०-२२ वर्षांपासून अत्यंत दुरवस्थेत असून आता तर हा हॉल अनधिकृत व्यवहाराचा अड्डाच बनला आहे. चांगल्या हेतूने बांधलेला हा हॉल सध्या बेवारस अवस्थेत पडून आहे. महापालिकेचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
महानगरपालिका प्रशासनाने मागच्या काही वर्षात शहरात विविध ठिकाणी सांस्कृतिक हॉल बांधले आहेत. नागरिकांना छोट्या छोट्या वैयक्तिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमास सहज उपलब्ध व्हावा, अभ्यासिकेसाठी विद्यार्थ्यांना त्याचा वापर व्हावा या हेतूने भागातील नगरसेवकांच्या आग्रहातून या सार्वजनिक हॉलची बांधणी झाली; परंतु गेल्या काही वर्षांपासून शहरात काही ठिकाणी अशा हॉलची दुर्दशा झाली आहे. त्यामध्ये उत्तरेश्वरपेठेतील गणपतराव माने हाॅलचा समावेश आहे.
अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या हॉलमध्ये अनेक बेकायदेशीर व अनधिकृत व्यवहार सुरू आहेत, जवळपास तीन गुंठे जागेतील हा हॉल पूर्णपणे मोडकळीस आला असून त्याच्या टेरेसचा कब्जा एका मटका चालवणाऱ्या व्यक्ती व त्याच्या मुलांनी घेतला असल्याची चर्चा आहे. या टेरेसवर कबुतर खाना चालवला जात आहे. याठिकाणी जुगार आणि दारूच्या पार्ट्या राजरोसपणे सुरू असतात, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.
हॉलचे एक एक बांधकाम निखळून पडत आहे. टेरेसचा पुढील सज्जा कोसळण्याची शक्यता असून त्यामुळे स्थानिक रहिवाशाची तेथे नेहमी लहान मुले खेळत असतात, त्यामुळे तो पडल्यास जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेच्या इस्टेट विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
हॉलची दुरुस्ती करून याठिकाणी वाॅर्ड कार्यालय सुरू करता येईल किंवा नागरी सुविधा केंद्र सुरू करता येईल किंवा एखाद्या संस्थेला भाड्याने दिला तर नागरिकांना लाभ होण्याबरोबरच पालिकेला काही प्रमाणात उत्पन्न मिळू शकते.
फोटो क्रमांक - ०१०८२०२१-कोल-केएमसी हॉल
ओळ - कोल्हापूर महानगरपालिकेचा उत्तरेश्वरपेठेतील सांस्कृतिक हॉल मोडकळीस आला असून तो अवैध व्यवहाराचा अड्डा बनला आहे.