महापालिका ठप्प...

By admin | Published: August 23, 2016 12:45 AM2016-08-23T00:45:03+5:302016-08-23T00:53:29+5:30

कर्मचाऱ्यांचे आंदोलन : पुढील काळात समन्वय ठेवण्यावर एकमत

Municipal jam | महापालिका ठप्प...

महापालिका ठप्प...

Next

कोल्हापूर : महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर मनमानी कारभार करीत असून अधिकारी, कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत आहेत, असा आक्षेप ठेवून आयुक्तांचा निषेध करण्याकरिता महानगरपालिकेच्या सुमारे ४७०० कर्मचाऱ्यांनी सोमवारी कामकाज बंद ठेवले. परिणामी मुख्य कार्यालयासह चार विभागीय कार्यालये आंदोलनामुळे अक्षरश: ओस पडली. या आंदोलनाचा आरोग्यसेवेवर परिणाम झाला. दरम्यान, दुपारी महापौरांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उभयपक्षी चर्चा घडवून आणत यापुढील काळात योग्य समन्वय राखण्यावर एकमत घडवून आणले.
महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी कामचुकार कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या काही महिन्यांत ३५० हून अधिक कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस, ८५ कर्मचाऱ्यांवर पगारवाढ रोखण्याची कारवाई केली. चार दिवसांपूर्वी वर्कशॉप विभागाचे प्रभारी अधीक्षक चेतन शिंदे यांना निलंबित केले. त्यामुळे नाराज झालेल्या कर्मचाऱ्यांनी आयुक्तांचा निषेध करण्याकरिता सोमवारी एक दिवसाचे काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार झालेल्या आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मुख्य प्रशासकीय कार्यालयासह शहरातील गांधी मैदान, शिवाजी मार्केट, राजारामपुरी, ताराराणी मार्केट अशा चारही विभागीय कार्यालयांतील कामकाज बंद राहिले. नेहमी गर्दीने फुलणारी ही कार्यालये सोमवारी अक्षरश: ओस पडली. काही मोजके अधिकारी वगळता सर्वच अधिकारी, कर्मचारी, चतुर्थश्रेणी कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याने अनेक कार्यालये उघडलीही नाहीत. आंदोलनामुळे अधिकाऱ्यांना खासगी वाहनाने यावे लागले, आरोग्यसेवेवर मोठा परिणाम
झाला, कंटेनरमधून कचरा तसाच पडून राहिला. आंदोलनात आरोग्य, पवडी, घरफाळा, आस्थापना, लेखापाल, पाणीपुरवठा बिलिंग, परवाना, इस्टेट, रवका, विधीशाखा, आदी विभाग बंद राहिले; तर अत्यावश्यक सेवेतील अग्निशमन, पाणीपुरवठा विभाग, रुग्णालये, आदी विभागांतील कर्मचारी सहभागी झाले नाहीत.
सकाळी दहा वाजता सुमारे तीन हजार कर्मचारी विठ्ठल रामजी शिंदे चौकात जमले. तेथे ‘हमारी युनियन, हमारी ताकद’, ‘कर्मचाऱ्यांवर आकसाने कारवाई करणाऱ्या आयुक्तांचा निषेध असो’ अशा घोषणा देऊन चौक दणाणून सोडला. त्यानंतर जमलेले सर्व कर्मचारी दसरा चौक येथे हद्दवाढ मागणीसाठी धरणे धरण्यासाठी गेले. त्यानंतर दोन तासांनी पुन्हा सर्व कर्मचारी महापालिका चौकात आले. त्या ठिकाणी झालेल्या सभेत माजी महापौर आर. के. पोवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर, स्थायी सभापती मुरलीधर जाधव, परिवहन सभापती लाला भोसले, नगरसेवक सुनील कदम, सत्यजित कदम, भूपाल शेटे, अनिल कदम, आदींनी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला. यावेळी कर्मचारी संघाचे अध्यक्ष रमेश देसाई, कार्याध्यक्ष विजय वणकुद्रे, दिनकर आवळे, अजित तिवले, विजय चरापले, कुंदन लिमकर, सिकंदर सोनुले उपस्थित होते.
हुकूमशाही नको : प्रा.पाटील
कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करा; पण ती हुकूमशाही पद्धतीची, दहशतीची असता कामा नये. कर्मचारी आंदोलन करीत असतील तर ते मोडून काढता येणार नाही किंवा ‘मेस्मा’अंतर्गत कारवाई करता येणार नाही, असे प्रा. जयंत पाटील यांनी कर्मचाऱ्यांसमोर बोलताना सांगितले. महापौरांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी पदाधिकारी, महापालिका पदाधिकारी, अधिकारी यांची एक समन्वय बैठक घेऊन त्यातून मार्ग काढण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी महापौर रामाणे यांनीही आयुक्त व कर्मचारी यांच्यातील वादातून योग्य मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.

...तर कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभे राहू
चौकात सभा सुरू होती त्याचवेळी महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, महिला बालकल्याण सभापती वृषाली कदम, सभागृह नेता प्रवीण केसरकर, गटनेता शारंगधर देशमुख, प्रा. जयंत पाटील यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन चर्चा केली. प्रशासन चालवीत असताना कर्मचारी संघाचे पदाधिकारी, नगरसेवक, पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन योग्य समन्वय साधून कामकाज करावे, अशी सूचना या सर्वांनी आयुक्तांना केली. जर आयुक्तांनी आपल्या भूमिकेत बदल केला नाही, तर आम्हाला कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभे राहावे लागेल, असा इशारा शारंगधर देशमुख यांनी यावेळी दिला.



सकारात्मक चर्चा; आंदोलन मागे
दुपारी साडेतीन वाजता महापौर रामाणे, आयुक्त शिवशंकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये समाधानकारक चर्चा होऊन आंदोलन मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. पाणीपुरवठा विभागाकडील मीटर रिडरना दररोज सात तास काम करावे, त्यांना एक मदतनीस दिला जाईल, प्रत्येक मीटर रिडरना २५०० मीटरचे उद्दिष्ट असेल, निलंबित यंत्रशाळा अधीक्षक चेतन शिंदे यांचा खुलासा आल्यानंतर त्याच्यावर निर्णय घेणे, असे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. यावेळी कर्मचारी संघाचे अध्यक्ष रमेश देसाई, उपमहापौर शमा मुल्ला यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

कामचुकार कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेली कारवाई योग्यच आहे. कर्मचाऱ्यांनी केलेले आंदोलन चुकीचे असून, कर्मचारी संघाचे पदाधिकारी अशा कामचुकार कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. आजच्या आंदोलनाबद्दल कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कपात करण्यात येईल. तसेच ‘मेस्मा’ कायद्यांतर्गत कारवाई करण्यासंदर्भात राज्य सरकारला प्रस्ताव पाठविला जाईल.
- पी. शिवशंकर, आयुक्त

आयुक्तांना काय कारवाई करायची ती करू द्या. कशी पगार कपात करतात ते बघायचे आहे. आम्ही आजच्या दिवसाचा पगारही घेऊ. आयुक्तांनी शिपायांना स्पॉट बिलिंगचे काम देणे, अभियंत्यांना कमी दर्जाची कामे देणे योग्य नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांत नाराजीचे वातावरण आहे. कर्मचाऱ्यांना त्यांची क्षमता, शिक्षण बघून काम दिले पाहिजे. यासाठीच आंदोलन करावे लागले.
- रमेश देसाई, अध्यक्ष, कर्मचारी संघ

Web Title: Municipal jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.