महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यास मारहाण

By Admin | Published: March 27, 2015 12:27 AM2015-03-27T00:27:02+5:302015-03-27T00:29:14+5:30

बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर गुन्हा

The municipal junior engineer assault | महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यास मारहाण

महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यास मारहाण

googlenewsNext

कोल्हापूर : मोजमाप पुस्तिका देण्यास नकार दिल्याने गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने महापालिकेच्या गांधी मैदान कार्यालयातील कनिष्ठ अभियंत्यास बेदम मारहाण केली. निवास साधू पोवार (वय ४०, रा. इंगवले कॉलनी, फुलेवाडी) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी पोवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुना राजवाडा पोलिसांनी संशयित आरोपी रविराज भीमराव मोहिते (रा. नागाळा पार्क) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
याबाबत पोलिसांनी सांगितले, महापालिकेच्या गांधी मैदान येथील विभागीय बांधकाम कार्यालयात कनिष्ठ अभियंता निवास पोवार हे सकाळी कामावर होते. यावेळी महापालिकेचे परवानाधारक बांधकाम व्यावसायिक भीमराव मोहिते यांचा मुलगा रविराज कार्यालयात आला. त्याने पोवार यांच्याकडे मोजमाप पुस्तिकेची मागणी केली. त्यावर त्यांनी कायद्याने ती देता येत नाही. तुम्ही अकराच्या सुमारास महापालिकेत या. वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारून दाखविली जाईल, असे सांगितले. पुस्तिका देत नसल्याचा रागातून रविराज याने पोवार यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीच्या या प्रकाराने कार्यालयात गोंधळ उडाला. यावेळी इतर कर्मचाऱ्यांनी पोवार यांची सुटका केली. त्यानंतर रविराज हा शिवीगाळ करीत निघून गेला. पोवार यांनी या प्रकाराची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितली. त्यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद देण्यास सांगितले. पोवार यांना मारहाण झाल्याची माहिती समजताच महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह इतर कर्मचारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आले. याठिकाणी त्यांनी रविराज मोहितेविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर मारहाणीत डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याने पोवार यांच्यावर ‘सीपीआर’मध्ये उपचार करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत संशयित आरोपी मोहिते याला अटक केली नव्हती. याप्रकरणी पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The municipal junior engineer assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.