पालिका सभेत ‘त्या’ अकरा विषयांवरून पुन्हा गोंधळ

By admin | Published: August 18, 2015 01:04 AM2015-08-18T01:04:42+5:302015-08-18T01:04:42+5:30

इचलकरंजीचे राजकारण : सभेसाठी कॉँग्रेसकडून नगरसेवकांना व्हीप

In the municipal meeting, those 'eleven' issues were again confused | पालिका सभेत ‘त्या’ अकरा विषयांवरून पुन्हा गोंधळ

पालिका सभेत ‘त्या’ अकरा विषयांवरून पुन्हा गोंधळ

Next

इचलकरंजी : नगरपालिकेच्या मागील सभेमध्ये झालेल्या गोंधळात घेण्यात आलेले अकरा विषय रद्द करून पुन्हा तेच विषय सोमवारच्या सभेत विषयपत्रिकेवर घेण्यावरून सभेच्या सुरुवातीलाच कॉँग्रेस व शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. परस्परांवर झालेल्या शेरेबाजीमुळे टीकाटिप्पणी होऊन काही काळ गोंधळ झाला. मात्र, दोन्ही सभेमधील विषय समान असल्याने मागील सभेतील ठरावामध्ये चर्चा करून दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेतील गुंठेवारी नियमितीकरण व आरक्षणे वगळण्याचा असलेला शहर विकास आघाडीचा प्रतिष्ठेचा विषय मात्र पुढील सभेमध्ये घेण्याचे ठरले. सोमवारच्या सभेसाठी राष्ट्रीय कॉँग्रेसने आपल्या नगरसेवकांना व्हीप लागू केला होता.
जुलै महिन्यामधील दि. ९ रोजी झालेल्या सभेमध्ये सभेच्या अध्यक्षपदावर उपनगराध्यक्षांना बसविण्याऐवजी शहर विकास आघाडीच्या पक्षप्रतोदांना बसविल्याबद्दल कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांना जाब विचारला होता. तेव्हा अभूतपूर्व गोंधळ माजला. या गोंधळातच नगराध्यक्षांनी सभेच्या पटलावर असलेले विषयपत्रिकेतील १५ ते २६ या क्रमांकाचे विषय मंजूर झाल्याचे घोषित केले होते. मात्र, हे विषय मंजूर करू नयेत, अशी तक्रार राष्ट्रीय व राष्ट्रवादी या दोन्ही कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
हे अकरा विषय मंजूर झाल्याचे समजून त्याचे प्रस्ताव तयार करण्यात आले होते; पण या प्रस्तावांना जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी नसल्याने ते विषय मुख्याधिकारी सुनील पवार यांनी प्रलंबित ठेवले होते. या अकरा विषयांमध्ये शहरातील स्वच्छता व कचरा उठाव, लेक वाचवा अभियानांतर्गत नवीन जन्मलेल्या मुलीच्या नावे दहा हजार रुपयांची ठेव ठेवणे, गुंठेवारी नियमितीकरण व आरक्षणे वगळणे अशा प्रकारच्या महत्त्वाच्या विषयांचा अंतर्भाव होता. त्यामुळे या अकरा विषयांसाठी विशेष सभा बोलवावी, अशा प्रकारचे निवेदन ‘शविआ’ने नगराध्यक्षा बिरंजे यांना दिले होते. त्याप्रमाणे आजची सभा नगराध्यक्षांनी आयोजित केली होती.
सभेच्या सुरुवातीलाच मागील सभेमध्ये झालेल्या त्या अकरा विषयांचे प्रस्ताव रद्द करावे आणि आजची सभा सुरू करावी, अशी सूचना कॉँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी मांडल्यामुळे खळबळ माजली. यावर बोलताना राष्ट्रवादीचे नगरसेवक विठ्ठल चोपडे यांनी मागील सभेमधील त्या विषयावर दुरुस्ती करावी, असे सूचित केले. मात्र, राष्ट्रीय कॉँग्रेस ही सूचना मानत नसल्याने कॉँग्रेस व शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यावेळी परस्परांवर टीकाटिप्पणीही करण्यात आली. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता. यावेळच्या चर्चेत भीमराव अतिग्रे, संभाजीराव काटकर, अजित जाधव, सुनील पाटील, संजय कांबळे, रवींद्र माने, रणजित जाधव, सयाजी चव्हाण, मदन झोरे, भाऊसाहेब आवळे, आदींनी भाग घेतला. अखेर मागील सभेतील प्रस्तावांमध्ये सोमवारच्या झालेल्या सभेमधील चर्चेच्या निर्णयानुसार दुरुस्ती करून हे विषय मंजूर करण्यात येतील, असे म्हणणे नगराध्यक्षा बिरंजे यांनी मांडले.
घरोघरीच्या कचऱ्यासाठी अडीच कोटी
नगरपालिकेच्या सभेमध्ये घरोघरी कचरा जमा करून तो कचरा डेपोवर टाकण्याचा दोन कोटी नऊ लाख रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्याबरोबरच शहरातील प्रत्येक कुटुंबाला प्लास्टिकची डस्टबीन देण्यासाठी ५० लाख रुपयास मंजुरी दिली. तसेच नगरपालिकेला मिळालेल्या कावीळ निवारणाच्या दोन कोटी रुपये विशेष निधीतील एक कोटी रुपये अन्यत्र खर्चासाठी सहमती दर्शविण्यात आली.

Web Title: In the municipal meeting, those 'eleven' issues were again confused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.