कुरुंदवाडमध्ये भूखंड वाटपावरून पालिकेचे राजकारण तापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:15 AM2021-07-23T04:15:22+5:302021-07-23T04:15:22+5:30
कुरुंदवाड : शहरातील पालिकेच्या आरक्षित जागेच्या भूखंड वाटपावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधाऱ्यांनी पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपल्याच ...
कुरुंदवाड : शहरातील पालिकेच्या आरक्षित जागेच्या भूखंड वाटपावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधाऱ्यांनी पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपल्याच मर्जीतील ४१ भूखंड व्यक्तिगत व संस्थांना भाडेतत्त्वावर वाटप केल्याने शहरवासीयांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर भूखंड वाटप बेकायदेशीर असून त्याविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अर्शद बागवान यांनी दिला आहे. त्यामुळे पालिकेचे भूखंड वाटपावरून राजकारण चव्हाट्यावर आला आहे.
शहरातील आरक्षित जागेवर पालिकेने ज्या विकासकामासाठी आरक्षित केले आहे. त्यावर विकास करण्याची पालिकेची जबाबदारी असते. मात्र, पालिकेने आरक्षित जागा डेव्हलपच केली नसल्याने अनेक जागा मालकांनी न्यायालयात जाऊन जागा परत मिळविली आहे. असे असतानाही पालिका सत्ताधाऱ्यांनी आरक्षित जागेवर डेव्हलप करण्याऐवजी मर्जीतील लोकांना, संस्थांना खिरापत वाटल्यासारखे वाटत आहेत.
शहरातील ४१ भूखंड व्यक्तिगत व काही संस्थांना नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी कोणतीही लिलाव प्रक्रिया न राबवत स्थायी बैठकीत भाडेतत्त्वावर जागा वाटप करण्याला मंजुरी दिली आहे. मात्र, पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपल्याला मदत होईल अशी व्यक्ती, संस्थांना भूखंड दिल्याने शहरवासीयांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे भूखंड वाटपावरून राजकारण तापले असून सत्ताधाऱ्यांचा राजकीय खेळ चव्हाट्यावर आला आहे.
कोट - नगराध्यक्षांनी स्थायी समिती बैठकीत जागा वाटपाचा निर्णय घेतला असून, जागा वाटपाचा निर्णय नियमानुसार झाला आहे.
- प्रा. सुनील चव्हाण, उपनगराध्यक्ष, कुरुंदवाड नगरपालिका