उपनगरात पाणीबाणीवरून पालिकेचे राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:26 AM2021-07-27T04:26:30+5:302021-07-27T04:26:30+5:30
कळंबा : शहराला पुराच्या पाण्याने वेढा दिला असतानाच महापुरात पालिकेची पाणीपुरवठा करणारी केंद्रे पाण्यात गेल्याने कळंब्यालगतच्या उपनगरात नागरिकांना ...
कळंबा : शहराला पुराच्या पाण्याने वेढा दिला असतानाच महापुरात पालिकेची पाणीपुरवठा करणारी केंद्रे पाण्यात गेल्याने कळंब्यालगतच्या उपनगरात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. उपनगराचा पाणीपुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांना दिलासा देण्यासाठी माजी लोकप्रतिनिधीसह नगरसेवक इच्छुकांनी मोफत टँकरने पाणीपुरवठा पुरवण्याचा सपाटाच लावला आहे.
पाणीपुरवठा ठप्प होताच सुरुवातीला कुटुंबातील आबालवृद्धांसह पाणी मिळवताना नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यात शुद्धीकरण केंद्रातून मिळणारे विकतचे पाण्यात बोअरचे पाणी विकत काही जणांनी चांदी करून घेतली. पालिका निवडणुकीसाठी नामी संधी चालून आल्याने माजी नगरसेवकांसह इच्छुकांनी कळंबा फिल्टर हाऊसवर टँकर पळवापळवी सुरू केली. अखेर पालिका आयुक्तांनी दोन तास ठिय्या मारून पाणीवाटपाचे नियोजन लावून दिले.
प्रभागात आता पाण्याच्या टँकरवर इच्छुक उमेदवारांनी आपली बॅनरबाजी करत मोफत पाणीवाटप सुरू केल्याने महापुरातही पालिकेचे राजकारण तापल्याचे पहावयास मिळत आहे. तर घरपोच पाणी मिळत असल्याने जनता मात्र खूश झाली आहे.
२६ कळंबा वॉटर
फोटो मेल केला आहे
फोटो ओळ उपनगरात महापुरात पाणीवाटपात टँकरवर बॅनरबाजी करत मोफत पाणीवाटप सुरू झाले आहे