महापालिकेच्या शाळा ऑनलाइन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:31 AM2021-06-16T04:31:08+5:302021-06-16T04:31:08+5:30
कोल्हापूर : गेल्या पंधरा महिन्यांपासून कोल्हापूर शहरात कोविड -१९ च्या प्रादुर्भाव सुरूच असल्यामुळे मंगळवारपासून महानगरपालिकेच्या शहरतील शाळा ऑनलाइन सुरू ...
कोल्हापूर : गेल्या पंधरा महिन्यांपासून कोल्हापूर शहरात कोविड -१९ च्या प्रादुर्भाव सुरूच असल्यामुळे मंगळवारपासून महानगरपालिकेच्या शहरतील शाळा ऑनलाइन सुरू झाल्या.
महापालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन प्रवेशासाठी शाळास्तरावर लिंक तयार करून लिंकद्वारे ऑनलाइन पटनोंदणी प्रक्रिया राबविली. तर काही शाळात शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करत प्रत्यक्ष पालकांच्या उपस्थितीत प्रवेश प्रक्रिया राबविली. महापालिकेच्या शालेय पटनोंदणी उपक्रमास यंदा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
महानगरपालिकेच्या ५८ प्राथमिक शाळांनी ‘शाळा नाही पण शिक्षण आहे’ या उपक्रमाची उत्तम प्रकारे सुरुवात केली आहे. मंगळवारी शाळेच्या पहिल्या दिवशी ऑनलाइन शिक्षणास प्रारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी शिक्षकांनी किती विद्यार्थ्यांच्या पालकांकडे ॲन्ड्रॉइड मोबाइल आहे याची माहिती घेतली. बहुतांशी पालकांकडे ॲन्ड्रॉइड मोबाइल व टीव्ही असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या अनुषंगाने शिक्षकांनी पहिल्याच दिवसापासून विविध ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन अध्यापन सुरू केले.
काही शिक्षकांनी स्वत:चे असे शैक्षणिक चित्रफिती तयार केल्या आहेत. ते वारंवार पालकांशी संपर्क ठेवत आहेत. पाल्याच्या अभ्यासाची माहिती घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन करून घेतले असून शासनाच्या दीक्षा ॲपचा अध्ययन व अध्यापनासाठी वापर करण्याबाबत सूचित केले आहे. शाळेमध्ये नियोजनाप्रमाणे अभ्यास होत असलेबाबत शिक्षण विभागाकडून पाठपुरावा केला जाणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे ॲन्ड्रॉइड मोबाइल नाहीत, अशा पालकांना टीव्हीवरील शैक्षणिक मालिकांविषयी शिक्षकांनी माहिती दिली. विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा लवकरच करण्यात येणार आहे. शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत शाळा ऑनलाइनच सुरू राहणार असल्याचे प्रशासन अधिकारी शंकर यादव यांनी सांगितले आहे.