महापालिका शाळा डिजिटल करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:41 AM2021-02-06T04:41:13+5:302021-02-06T04:41:13+5:30
कोल्हापूर : आगामी वर्षात लोकसहभागाच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या शाळातील शैक्षणिक गुणवत्ता तसेच भौतिक सुविधा सुधारण्यावर सर्वाधिक लक्ष दिले जाणार असल्याची ...
कोल्हापूर : आगामी वर्षात लोकसहभागाच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या शाळातील शैक्षणिक गुणवत्ता तसेच भौतिक सुविधा सुधारण्यावर सर्वाधिक लक्ष दिले जाणार असल्याची माहिती महापालिका उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली. टेक्नोसॅव्ही शिक्षक ते डिजिटल क्लासरुम असा बदल आगामी एक वर्षात दिसेल, असा निर्धारही त्यांनी यावेळी बोलून दाखविला.
कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे प्रशासन अधिकारी म्हणून काम केलेले आडसूळ नुकतेच कोल्हापूर महानगरपालिकेत उपायुक्त म्हणून रुजू झाले आहेत. केएमटी, शिक्षण समिती, मालमत्ता, कामगार, अंतर्गत लेखापरीक्षण अशी विविध खाती त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. गेल्या आठ दिवसांत त्यांनी या सर्व विभागाच्या बैठका घेऊन नवीन काय संकल्पना राबविता येतील याचा आढावा घेतला.
खासगी शाळांच्या तुलनेत महापालिकेच्या शाळातील पटसंख्या कमी होत आहे. त्यामुळे या शाळांकडे विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवायची असेल तर प्रशासनासही काहीतरी नवीन करून दाखविण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अन्य शाळांच्या तुलनेत सर्वाधिक भौतिक सुविधा देण्यासह डिजिटल क्लासरुम, ऑनलाईन परीक्षा, टेक्नोसॅव्ही शिक्षक असे उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात येतील. जिजामाता गर्ल्स हायस्कूलचा लूक बदलण्यात येईल. मोठ्या कंपन्यांच्या सहकार्यातून सीएसआर फंड मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही आडसूळ यांनी सांगितले.
केएमटी सेवा सुधारण्याबरोबरच ती अधिक कार्यक्षम करुन तोटा भरून काढणे हे एक आव्हान आहे. मात्र, नवनवीन उपक्रम राबवून हा तोटा कमी करण्याचा माझा प्रयत्न आहे. कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाल्यास आपण निश्चितपणे चांगले काम करून दाखवू असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
- तक्रारींचे डिजिटायझेशन-
महापालिकेचे काम गतिमान करण्यासाठी ई गव्हर्नन्स प्रकल्प राबविला असला तरी त्यातही काही सुधारणा करणे आवश्यक आहे. नागरिक तक्रार करतात, तो अर्ज ब्युरो ऑफिसमध्ये द्यावा लागतो. नंतर तो टपालाने विविध कार्यालयात फिरत राहतो. त्यात वेळ निघून जातो. आता हे बंद करुन ब्युरोत ऑनलाईन तक्रार नोंदविली की ती झटपट संबंधितांपर्यंत पोहोचेल, असे सॉफ्टवेअर तयार करण्याच्या सूचना ई गव्हर्नन्सला दिल्याचे आडसूळ यांनी सांगितले.