पालिका तिजोरीच्या चाव्या काँग्रेसकडे-- सातपुते यांची सभापतिपदी बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:24 AM2017-09-14T00:24:15+5:302017-09-14T00:25:23+5:30
सांगली : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा महापालिकेतील तिजोरीच्या चाव्या काँग्रेसच्या हाती आल्या. बुधवारी स्थायी समितीच्या सभापतिपदी मिरजेचे बसवेश्वर सातपुते यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा महापालिकेतील तिजोरीच्या चाव्या काँग्रेसच्या हाती आल्या. बुधवारी स्थायी समितीच्या सभापतिपदी मिरजेचे बसवेश्वर सातपुते यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली. महापालिका निवडणुकीपूर्वी मिरज पाणीपुरवठा योजनेसह ड्रेनेज आणि विकासकामाच्या फायली मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करू, असे सभापती सातपुते यांनी स्पष्ट केले.
सभापतिपदासाठी सत्ताधारी काँग्रेसमध्ये मोठी चुरस होती. सातपुते यांच्यासह दिलीप पाटील, रोहिणी पाटील, किशोर लाटणे यांची नावे चर्चेत होती. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी सातपुते यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मंगळवारी सभापतिपदासाठी त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. बुधवारी सकाळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सभापती निवडीची प्रक्रिया पार पडली. त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर अभिजित राऊत, आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी सातपुते यांचा सत्कार केला.
सातपुते यांना महापौर हारुण शिकलगार, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, उपमहापौर विजय घाडगे, सदस्य दिलीप पाटील, संतोष पाटील, बबिता मेंढे, संजय मेंढे, प्रशांत पाटील, प्रशांत मजलेकर, मृणाल पाटील, विशाल कलकुटगी यांनी सभापतिपदाच्या खुर्चीवर बसविले. निवडीनंतर सातपुते म्हणाले, कॉँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, पतंगराव कदम,राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यामुळे मला बिनविरोध सभापतिपदाची संधी मिळाली.
यासाठी महापौर शिकलगार, गटनेते किशोर जामदार, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, पृथ्वीराज पाटील, अन्य पदाधिकारी, नगरसवेकांनीही प्रयत्न केले. महापालिका क्षेत्रातील अपुºया योजना, रस्ते, गटारी, आरोग्य या नागरी समस्या मार्गी लावणार आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थितीही सक्षम करण्यावर भर असेल.
सातपुते म्हणाले, निवडणुकीत सर्वांनी साथ दिल्यामुळे साहजीकच विकासाची ही एकी आम्ही कामातून दाखवू. सांगली, मिरजेतील ड्रेनेज योजना रखडली आहे. त्यातील अडचणी आणि त्रुटी दूर करू. ती मार्गी लावण्यासाठी जलदगती कार्यक्रम राबवू. कुपवाड ड्रेनेज योजनेसाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाशी चर्चा करून हा प्रश्न निकाली काढू. मिरजेसाठी केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून ११०३ कोटींची पाणी योजना मंजूर झाली आहे.
महापौर-उपमहापौरांत जुंपली
सभापती निवडीच्या निमित्ताने काँग्रेस-राष्ट्रवादीतून आघाडीचे संकेत देण्यात आले असले तरी, काँग्रेसमधीलच उपमहापौर गट व स्वाभिमानी आघाडीला मात्र वेगळे ठेवण्यात आले आहे. त्याची प्रचिती सभापती निवडीवेळी आली. नूतन सभापती सातपुते यांच्या सत्काराच्या निमित्ताने महापौर शिकलगार यांनी चांगलीच टोलेबाजी केली. बिनविरोधला खोडा घालणारे, निवडीवरून गैरकारभाराचे आरोप करणारे, सत्तेचा बाजार करणारे आज सत्कारासाठी धावल्याचा टोला उपमहापौरांना लगाविला. यावरून उपमहापौर विजय घाडगे यांनीही, बाजार करण्याचा मार्ग तुमचा, आमचा नव्हे, असा प्रतिटोला लगावला. याची दिवसभर महापालिका वर्तुळामध्ये नगरसेवकांमध्ये चर्चा सुरु होती.