फेरीवाल्यांना शुल्क लावण्याचा पालिकेचा विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:30 AM2021-02-27T04:30:03+5:302021-02-27T04:30:03+5:30
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड येथील फेरीवाले, विक्रेत्यांच्या बाबतीत सहकार्य ...
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड येथील फेरीवाले, विक्रेत्यांच्या बाबतीत सहकार्य करण्याची ग्वाही दिल्यानंतरही प्रत्यक्ष तोडगा काढण्याची वेळ आली तेव्हा पुन्हा असहकार्य केल्यामुळे महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे या यापुढील काळात कडक कारवाई करण्याच्या प्रयत्नात आहेत.
पालिका प्रशासक बलकवडे यांनी शिस्त तर लावण्यात पुढाकार घेतला आहेच, शिवाय रस्त्यावर बसून विनाशुल्क व्यवसाय करणाऱ्या फेरवाल्यांना प्रतिदिन शुल्कही आकारण्याचा त्यांचा विचार आहे. त्यांनी याबाबत इस्टेट विभागाकडून माहिती मागविली असल्याचे सांगण्यात येते. सध्या शहरातील भाजी मार्केटमध्ये विक्रेत्यांना प्रतिदिन चार बुट्ट्यांसाठी पंधरा रुपये तर चारपेक्षा अधिक बुट्ट्यांसाठी वीस रुपये घेतले जाते.
भाजीविक्रेत्यांना आकारल्या जाणाऱ्या शुल्काची आधारभूत रक्कम धरून फेरीवाल्यांसाठीचे शुल्क निश्चित केले जाणार आहे. त्यातही शहर आणि उपनगर यांचे शुल्क वेगवेगळे असणार आहे. जर अशी आकारणी झाली तर महिन्याला एका विक्रेत्याला पाचशे ते सहाशे रुपयांप्रमाणे किमान तीन ते चार कोटींचे वार्षिक उत्पन्न मिळणार आहे.
लवकरच समित्याही नेमणार -
शहरात लवकरच शहरस्तरीय फेरीवाला समिती नेमली जाणार आहे. त्यात सर्वेक्षणात निश्चित केलेल्या फेरीवाल्यांमधून आठ प्रतिनिधी निवडले जाणार आहेत. या समितीमार्फत शहरातील फेरीवाला झोन ठरवून राष्ट्रीय फेरीवाला धोरणांची अंमलबजावणी केली जाणार आहे.