मोर्चेकऱ्यांना सुविधा देण्यास महापालिका सज्ज

By admin | Published: October 14, 2016 12:51 AM2016-10-14T00:51:59+5:302016-10-14T01:17:00+5:30

महापौर, आयुक्तांनी केली पाहणी : ७०० तात्पुरती स्वच्छतागृहे; अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात

The municipality is ready to facilitate the morchas | मोर्चेकऱ्यांना सुविधा देण्यास महापालिका सज्ज

मोर्चेकऱ्यांना सुविधा देण्यास महापालिका सज्ज

Next

कोल्हापूर : शनिवारी शहरातून निघणाऱ्या मराठा क्रांती मूकमोर्चातील नागरिकांना महापालिकेमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवा-सुविधांचा गुरुवारी महापौर अश्विनी रामाणे व आयुक्त पी. शिवशंकर यांनी आढावा घेतला. त्यानिमित्ताने त्यांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकारी, पदाधिकाऱ्यांसह शहरात विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. गुरुवारी एकाच दिवसात मुख्य मार्गावरील शंभराहून अधिक खोकी, केबिन्स हटविण्यात आली. पॅचवर्कची कामे गतीने सुरू करण्यात आली असून आज शुक्रवारपर्यंत ही सर्व तयारी पूर्ण होईल, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला.
गुरुवारी विविध ठिकाणच्या पार्किंग व्यवस्थेसह साफसफाई, जागा सपाटीकरण आदी कामांची पाहणी करण्यात आली. आरोग्य विभागाकडून मोर्चासाठी येणाऱ्या नागरिकांकरीता जवळपास ७०० तात्पुरती स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. ही स्वच्छतागृहे पार्किंग ठिकाणी व मोर्चाच्या मार्गावर उभी करण्यात येणार आहेत. गांधी मैदान तसेच दसरा चौक येथे स्वच्छता करण्यात येत आहे. यावेळी उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, नगरसेवक जयंत पाटील, नगरसेविका रूपाराणी निकम, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, पोलिस निरीक्षक अमृत देशमुख, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील, उपशहर अभियंता रमेश मस्कर, एन. एस. पाटील, हर्षजित घाटगे आदी उपस्थित होते.
मोर्चाच्या अनुषंगाने शहरातील मुख्य पुतळ्यांची सफाई व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तसेच मुख्य रस्त्यांचे डांबरीकरणाद्वारे पॅचवर्क, रस्त्यांवरील ड्रेनेज व चेंबरवरील झाकणे दुरुस्ती करणे आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. मोर्चाच्या मार्गावरील अतिक्रमण काढण्याची मोहीम गुरुवापासून सुरू करण्यात आली. या मोहिमेमध्ये नादुरूस्त ४५ चारचाकी, ८० केबिन / हातगाड्या हटविण्यात आल्या. ही मोहीम शुक्रवारीही सुरू ठेवण्यात येणार आहे. शनिवारी दुपारपर्यंत सर्व भाजी मार्केट, मटण, फिश व चिकन मार्केट, कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार आहेत.


मंडप डेकोरेटर्सचा पुढाकार
मोर्चाकरिता जिल्ह्णाबाहेरचे हजारो पोलिस कर्मचारी व अधिकारी कोल्हापुरात मुक्कामास येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या निवासाची व जेवण-खाण्याची व्यवस्था कोल्हापुरातील मंडप लायटिंग डेकोरेटर्स असोसिएशनतर्फे शहरातील सर्व मंगल कार्यालये आणि वीसहून अधिक हॉटेलमधील खोल्या उपलब्ध करून दिल्या आहेत. या सर्वांना दोनवेळचे जेवण दिले जाणार आहे. माजी महापौर सागर चव्हाण व माजी नगरसेवक सचिन चव्हाण यांनी या कामात पुढाकार घेतला आहे.
हॉटेल मालक संघाची सेवा
महानगरपालिकेने सार्वजनिक स्वच्छतागृहांची सोय केली असली तरी महिलांची गैरसोय होऊ नये म्हणून कोेल्हापूर हॉटेल मालक संघाने सर्व हॉटेलमधील स्वच्छतागृहे उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन हॉटेल मालक संघाने केले आहे.


हजार लोकांची भोजन व्यवस्था
मोर्चात सहभागी होणाऱ्या ग्रामीण भागातील लोकांच्या नाष्ट्याची, दुपारच्या भोजनाची व्यवस्था उत्स्फूर्तपणे केली जात आहे. उचगांव येथील बालाजी हॉटेलचे मालक प्रशांत घाटगे यांनी सामाजिक जाणीवेतून या दिवशी हॉटेलमध्ये येणाऱ्या सुमारे एक हजार मोर्चेकऱ्यांना मोफत भोजन देणार आहेत.

महापालिकेचे आपत्कालिन नियोजन
शनिवारी निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. मोर्चात सहभागी होणाऱ्यांची संख्या अभूतपूर्व असणार आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवा कशाप्रकारे देता येईल यावरही बारकाईने अभ्यास करून एक आराखडा तयार करण्यात आला आहे. डॉ. प्रल्हाद केळवकर, डॉ. मानसिंग घाटगे, डॉ. भारत कोटकर, डॉ. हरिष पाटील यांनी सूक्ष्म नियोजन केले आहे. शहरात प्रवेश करणारे नऊ मार्ग असून या मार्गांवर रुग्णवाहिका कुठे उभी राहणार, त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी कोण असणार तसेच आपत्कालिन परिस्थितीत संबंधित रुग्णवाहिकेतून रुग्ण अथवा जखमींना कोणत्या रुग्णालयात न्यायचे याचे नियोजन निश्चित करण्यात आले आहे. शक्यतो जवळच्या सरकारी, खासगी रुग्णालयांची त्याकरीता निवड केली आहे. त्यामुळे गरज भासलीच तर संबंधितांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळणार आहे. त्या काळात सर्व वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ उपस्थित राहणार आहेत.

Web Title: The municipality is ready to facilitate the morchas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.