मुरगूडला पाटील-मंडलिक गटच मुख्य स्पर्धक

By Admin | Published: October 28, 2016 11:55 PM2016-10-28T23:55:59+5:302016-10-28T23:55:59+5:30

मुश्रीफ-पाटील गट आघाडी : नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत उत्सुकता; घाटगे गट स्वतंत्रच लढणार

Munigudula is the main competitor, Patil-Mandalik Group | मुरगूडला पाटील-मंडलिक गटच मुख्य स्पर्धक

मुरगूडला पाटील-मंडलिक गटच मुख्य स्पर्धक

googlenewsNext

अनिल पाटील -- मुरगूड  नगरपालिका निवडणुकीत परंपरागत रणजितसिंह पाटील व प्रा. संजय मंडलिक या दोन गटांतच लढत होणार हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. आमदार हसन मुश्रीफ हे पाटील गटाच्या मागे उभा राहणार हे जवळजवळ निश्चित झाले असून, समरजितसिंह घाटगे गटाने आपली भूमिका स्वतंत्रपणेच निवडणुकीला सामोरे जाण्याचीच ठेवली आहे.
निवडणूक दुरंगी झाली काय किंवा तिरंगी झाली काय, पाटील व मंडलिक गटांतच ‘काटे की टक्कर’ होणार हे निश्चित आहे. कोणत्याच गटाने अद्याप नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर न केल्याने याबाबत उत्सुकता असून उमेदवारांच्या नावाबाबत उलटसुलट चर्चेलाही ऊत आला आहे.
जिल्ह्यातील ‘क’ वर्ग नगरपालिका क्षेत्रामध्ये जरी मुरगूडचा समावेश असला, तरी कोणत्याही निवडणुकीत शासकीय पातळीवर सर्वांत जास्त लक्ष याच शहरावर ठेवावे लागते. काणेत्याही निवडणुकीत जोरदार ईर्ष्या पर्यायाने संघर्ष या शहराबाबत कायमचाच. त्यामुळे निवडणुकीच्या तारखा जरी लांब असल्या, तरी राजकीय ज्वर फार दिवस आधीपासून वाढायला सुरुवात होतो. सीमाभागातील महत्त्वाचे शहर असणाऱ्या आणि माजी खासदार सदाशिवराव मंडलिकांचे जन्मगाव म्हणून ओळख असणाऱ्या मुरगूडच्या राजकारणावर मात्र विश्वनाथराव पाटील यांच्या गटाने वर्चस्व दाखविले आहे. अर्थात काहीवेळा हे
वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी त्या गटाला अन्य गटांची मदत घ्यावी लागली आहे.
यावेळी होणारी नगरपालिका निवडणूक वेगळ्या वळणावरची आहे. मंडलिक-मुश्रीफ यांच्यात वाद झाल्यापासून मुरगूड परिसरात मुश्रीफ आणि पाटील गटाची भक्कम आघाडी तयार झाली; पण काही दिवसांपासून मंडलिक आणि मुश्रीफ गटाची जवळीक वाढू लागल्याने तालुक्याच्या व पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगळ्या घडामोडी दिसतील, अशी शक्यता निर्माण झाली होती. मुरगूड शहरामध्ये तर गेल्या वर्षापासून समरजित घाटगे यांनी घरभेटीचा धडाका लावत पालिका निवडणूक तयारीनिशी लढवायची, अशी भूमिका आजही कायम ठेवली आहे.
शहरामध्ये अनेक वर्षांपासून पाटील आणि मंडलिक गटच तुल्यबळ आहेत. सध्या मुश्रीफ गटातील आणि मागील निवडणुकीत राष्ट्रवादीतून विजयी झालेले राजेखान जमादार आणि त्यांचे अन्य दोन नगरसेवक मंडलिक गटात डेरेदाखल झाल्याने मंडलिक गटाची ताकद थोडी वाढल्याचे दिसून येते. त्यातच मंडलिक गटाचे आणि समरजित घाटगे गटाचे कार्यकर्ते आपल्यात युती झाल्याचे सांगत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत पाटील-मुश्रीफ आघाडी यांच्या विरोधात मंडलिक समरजित घाटगे आघाडी समोरासमोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण, जर समाधानकारक जागा निघाल्या नाहीत, तर मात्र समरजित घाटगे गट भाजपच्या ‘कमळ’ चिन्हावर स्वतंत्रपणे जनमत आजमावण्याची शक्यता आहे.

पाटील गटाकडून नगराध्यक्षपदासाठी माजी उपनगराध्यक्ष संतोड वंडकर यांचे नाव आघाडीवर आहे. या पदासाठी त्यांनी आणि जोतिराम कुंभार या दोघांनीच आवेदनपत्र भरली आहेत; पण आश्चर्यकारकरीत्या या ठिकाणी दुसरा उमेदवार येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मंडलिक गटामध्ये मात्र या पदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. पूर्वाश्रमी मुश्रीफ गटाचे राजेखान जमादार यांचे नाव आघाडीवर असल्याचे अनेकजण सांगत असले तरी मंडलिक गटाचे गटनेते किरण गवाणकर, बाजीराव गोघडे, पांडुरंग भाट यांच्या नावाची सुद्धा जोरदार चर्चा आहे. अर्थातच संजय मंडलिक ज्याच्या हातामध्ये गटाचा झेंडा देतात तो सर्वांना मान्य असणार आहे.
मुश्रीफ गटाकडून या पदासाठी आवेदनपत्र दाखल झाली आहेत; पण जर पाटील गटाबरोबर युती झाली, तर हा गट या पदावरील आपला दावा सोडणार असल्याचे समजते.


गतवेळी गावभागात पाटील गटाने मुश्रीफ गटाच्या सहकार्याने तब्बल १३ उमेदवार विजयी करून एकहाती सत्ता काबीज केली होती. बाजारपेठ भागामध्ये मात्र मंडलिक गटाचा प्रभाव असल्याने या ठिकाणी त्यांचे चार नगरसेवक निवडून आले होते. या निवडणुकीत घाटगे गटाने कोणाला जाहीर पाठींबा दिला नव्हता; मात्र त्यांचे बऱ्यापैकी कार्यकर्ते पाटील गटाच्या प्रचारात सक्रिय होते. आता मात्र चित्र वेगळेच निर्माण झाल्याने वेगवेगळे अंदाज वर्तविले जात आहेत.

Web Title: Munigudula is the main competitor, Patil-Mandalik Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.