मुनिसुव्रत स्वामी जैन श्वेतांबर मंदिरात महापूजा
By admin | Published: March 12, 2016 12:27 AM2016-03-12T00:27:46+5:302016-03-12T00:33:12+5:30
अमृतमहोत्सवी सोहळ्याची सांगता : भक्तिमय वातावरण; दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी
कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील मुनिसुव्रत जैन श्वेतांबर मंदिरात अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त शुक्रवारी, भक्तिमय वातावरणात महापूजा झाली. यावेळी विविध भागांतून आलेल्या भाविकांनी दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत मोठी गर्दी केली होती.
सांगता सोहळ्यानिमित्त मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली होती. भगवंताच्या मूर्तीला सोन्या-चांदीने मढविण्यात आले होते. तसेच पन्नास हजार फुलांनी गाभारा सजविण्यात आला होता. मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये ७५ वर्षांपूर्वी उद्घाटनावेळची मिरवणूक, कलशारोहण सोहळ्याप्रसंगी काढण्यात आलेली छायाचित्रे डिजिटल स्वरूपात मांडण्यात आली होती.
दरम्यान, सकाळी ८.३० वाजता ध्वजारोहणाचा मान मिळालेले हिंदुमलजी जितराजजी राठोड यांच्या घरातून ध्वजा मंदिरात आणण्यात आली.
आचार्य श्रेयांसप्रभु सुरीश्वरजी महाराजांचे प्रवचन झाले. यावेळी ते म्हणाले, ‘जीवनात चांगल्या कामाचा संकल्प करा. चांगले कार्य करा. जेणेकरून सर्व मानवजातीचे कल्याण होईल व आपल्यालाही सद्गती प्राप्त होईल.’
सकाळी ११.३० वाजता आचार्यांच्या उपस्थितीत मंदिरावर धर्मध्वजारोहण विधी पार पडला. यावेळी ७० साधू महाराज व सुमारे दोन ते अडीच हजार श्रावक, श्राविका उपस्थित होते. यानंतर दुपारी अशोक संघवी, संजय देवीचा यांच्या हस्ते सत्तरभेदी पूजा करण्यात आली.
सायंकाळी ६.३० वाजता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष कांतीलाल गुलाबचंद ओसवाल, संघवी भबूतमलजी, सूरतमलजी निंबजीया यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.
कोल्हापुरातील सर्वांत जुने मंदिर म्हणून या मंदिराची ओळख आहे. संस्थानकाळात करवीरचे छत्रपती राजाराम महाराज यांच्या सक्रिय पुढाकाराने १९४१ मध्ये मंदिराची उभारणी झाली. मंदिरासाठी छत्रपतींनीच जागा उपलब्ध करून दिली होती. वास्तुकलेचा अनुपम आविष्कार म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते. त्याची बांधणी अतिशय कलात्मक झाली असून, मंदिराच्या अवतीभोवती विविध देवतांच्या शिल्पाकृती उभारण्यात आलेल्या आहेत. शहरात जैन समाजाची जी मंदिरे आहेत, त्यांपैकी शिखर असणारे हे एकमेव मंदिर आहे.
समाजाचे आध्यात्मिक केंद्र म्हणून सुपरिचित असलेल्या मंदिरात अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने गेल्या शुक्रवार (दि. ४) पासून अष्टान्हिका जिनेंद्र महोत्सव सुरू असून, यामध्ये भव्य सामैया, श्री पंचकल्याणक पूजा, आंगी रोशनाई, कुंभस्थापना, ज्वारारोहण, नवग्रह पाटला पूजन, अढार अभिषेक पूजन, लक्ष्मीपुरी संघाची नवकारशी, श्री ४५ आगम पूजा, शोभायात्रा, वरघोडा, लघुशांतीस्नात्र पूजन असे धार्मिक विधी, कार्यक्रम घेण्यात आले. तसेच मुंबई येथील गायक अनिल गेमावत व राजुभाई भोयणीवाला यांच्या भक्तिसंगीताचा सुश्राव्य कार्यक्रमही पार पडला.
सांगता सोहळ्यानिमित्त हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात येणार होती; परंतु काही तांत्रिक कारणास्तव ती रद्द करण्यात आली. श्री मुनिसुव्रत स्वामी जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टमार्फत चातुर्मास व पर्यूषण पर्वाच्या निमित्ताने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात. या सोहळ्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष कांतीलाल ओसवाल, उपाध्यक्ष अभय गांधी, बिपिन परमार, उपसेक्रेटरी हिंमत संघवी, नितीन राठोड, दिलीप गांधी, प्रमोद पटनी, दिलीप संघवी, धनराज ओसवाल, कन्हैयालाल राठोड, आदींनी नियोजन केले. (प्रतिनिधी)