लोकसभेला मुन्ना-मुश्रीफ कुस्ती शक्य

By admin | Published: May 4, 2017 01:01 AM2017-05-04T01:01:06+5:302017-05-04T01:01:06+5:30

मोर्चेबांधणी सुरू : पालकमंत्र्यांचे धनंजय महाडिकांना मंत्रिपदाचे संकेत; मुश्रीफांचा मंडलिकांशी घरोबा

Munna-Mushrif wrestling may be possible for the Lok Sabha | लोकसभेला मुन्ना-मुश्रीफ कुस्ती शक्य

लोकसभेला मुन्ना-मुश्रीफ कुस्ती शक्य

Next

विश्वास पाटील-- कोल्हापूर
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांना केंद्रात मंत्रिपद देण्याचा भाजप नेते व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेला शब्द पाहता, आगामी लोकसभेची निवडणूक खासदार महाडिक विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यात होण्याची शक्यता ठळक बनली आहे. या लढतीसाठी अजून तसा दोन वर्षांचा अवधी असला तरी जिल्ह्याचे राजकारण आता ही संभाव्य लढत लक्षात घेऊन आकार घेत आहे.
भाजप-शिवसेना स्वतंत्र लढली तरच भाजपला महाडिक यांना उमेदवारी देणे शक्य आहे. तसे घडले नाही तर मात्र महाडिक यांची अडचण होईल; कारण ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आहे; परंतु सध्याचे जिल्ह्यातील व राज्यातील या दोन पक्षांतील सख्य पाहता भाजप स्वबळावरच लढण्याची शक्यता जास्त आहे.
लोकसभेची निवडणूक मे २०१९ ला होऊ शकते. त्यामुळे आजपासून बरोबर दोन वर्षे त्यासाठी आहेत; परंतु या लढतीचे ‘राष्ट्रवादी’कडून मुश्रीफ, भाजपकडून धनंजय महाडिक व शिवसेनेकडून विजय देवणे असे संभाव्य चित्र दिसत आहे. दोन्ही काँग्रेसची राज्यातील व देशातील परिस्थिती पाहता आता ते स्वबळावर लढण्याची शक्यता नाही. त्यामुळे तिरंगी लढत होऊ शकते. गेल्या निवडणुकीत महाडिक विरुद्ध शिवसेनेकडून संजय मंडलिक यांच्यात लढत झाली. मंडलिक शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख आहेत; परंतु नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर त्यांनी मुश्रीफ यांच्याशी जुळवून घेतले आहे. मंडलिक कारखान्याच्या निवडणुकीत बिगरउत्पादक गटातील सर्व ठरावही मुश्रीफ गटाने बुधवारीच मंडलिक यांच्याकडे सुपूर्द केले. त्यामुळे यापुढील राजकारणात मुश्रीफ व मंडलिक हे एकत्रच राहणार हे स्पष्टच आहे. त्यामुळे मंडलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन त्यांना लोकसभेला रिंगणात उतरविणे किंवा त्यांना कागल विधानसभेसाठी संधी देऊन स्वत: लोकसभेच्या मैदानात उतरणे असे दोन पर्याय मुश्रीफ यांच्यासमोर आहेत. त्यांतील दुसऱ्या पर्यायाचीच शक्यता जास्त ठळक वाटते.
खासदार महाडिक हे जरी राष्ट्रवादीचे असले, तरी त्यांचे सुरुवातीपासूनच त्या पक्षात फारसे कुणाशी जमलेले नाही. त्यास त्यांची स्वत:ची भूमिकाही कारणीभूत आहे. ते जरी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले असले तरी आपली स्वत:ची एक महाडिक गट म्हणून ताकद आहे व त्या बळावर आपण निवडून आलो असे त्यांना कायमच वाटत आले आहे. त्यामुळे लोकसभेला एकदा निवडून आल्यावर त्यांची विधानसभा, महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही पक्षाच्या थेट विरोधात भूमिका राहिली. गेल्या काही दिवसांत त्यांचा भाजपशी घरोबा जास्तच वाढला आहे. भाजपलाही कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी आजच्या घडीला ताकदीचा उमेदवारच नाही. अमल महाडिक हे भाजपचेच आमदार, शौमिका महाडिक या भाजपकडूनच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आणि खासदार राष्ट्रवादीचे असे चित्र सध्या आहे. त्याऐवजी जे काही असेल ते एकाच पक्षाच्या छत्राखाली म्हणून भाजपची उमेदवारी महाडिक यांना जास्त सोयीची वाटते. त्यात सगळ्यांत महत्त्वाचे कारण म्हणजे केंद्रातील भाजप सरकारबद्दल लोकांच्या मनांत दिवसेंदिवस विश्वासाची भावना वाढीस लागली आहे. त्यामुळे एकदा कमळ चिन्ह घेतले तर स्थानिक राजकारणातून कितीही विरोध झाला तरी आपण जिंकू न येऊ शकतो, असे खासदार महाडिक यांचे गणित आहे.
मुश्रीफ यांनी थेट लोकसभेसाठी शड्डू ठोकला नसला तरी त्यांनी आपण लढणारच नाही असेही म्हटलेले नाही. गेल्या निवडणुकीत ते या मतावर ठाम होते; परंतु या वेळेला ते पक्षाने जबाबदारी दिली तर लढावे लागेल अशा पवित्र्यात आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या मुलाला अध्यक्ष करण्यासाठी पायांना पाने बांधली होती. तसे पी. एन. व त्यांचे फारसे राजकीय सख्य नसतानाही त्यांनी ही मोर्चेबांधणी केली. भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीतही त्यांनी पी. एन. यांना एक प्रकारे बायच दिल्याची चर्चा आहे. गेल्या निवडणुकीत हातात हंटर घेऊन उभे राहिलेले मुश्रीफ या निवडणुकीत मात्र तिकडे एकही सभा घ्यायला फिरकले नाहीत. स्वत:च्या वाढदिवसाला जे त्यांनी मार्केटिंग केले, तोदेखील या मोर्चेबांधणीचाच भाग होता. दुसरे महत्त्वाचे म्हणजे गेल्या अनेक दिवसांत त्यांनी भाबडेपणाने (त्यांच्याच भाषेत) का असेना, कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही. मुश्रीफ यांची जिल्ह्याचा नेता अशी प्रतिमा आहे. कोणत्याही वेळेला आणि कुणाच्याही मदतीला धावून येणारा माणूस अशी त्यांची ओळख आहे. प्रचंड संपर्क, एकदा मनावर घेतले तर त्यासाठी कोणत्याही टोकाला जाऊन राबण्याची तयारी ही त्यांची जमेची बाजू आहे. दोन्ही काँग्रेसची एकजूट आणि मुश्रीफ यांच्यासारखा तगडा उमेदवार असेल तर ते आव्हान निर्माण करू शकतात. या लढतीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील हे त्यांचे प्रचारप्रमुख असू शकतात हे स्पष्टच आहे.

धनंजय महाडिक -विजयी (राष्ट्रवादी) :
६,०७,६६५ (३४.५६ टक्के)
संजय मंडलिक (शिवसेना) : ५,७४,४०६ (३२.६७ टक्के)
एकूण मताधिक्य : ३३,२५९ (२.६९)

Web Title: Munna-Mushrif wrestling may be possible for the Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.