तेजाब’मधील ‘मुन्ना’चा व्हीनस कॉर्नरवर दंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 07:10 PM2018-04-08T19:10:40+5:302018-04-08T19:10:40+5:30
भर दुपारच्या टळटळीत उन्हात त्याने ‘तेजाब’मधील मुन्नासारखी एन्ट्री घेतली.
कोल्हापूर : भर दुपारच्या टळटळीत उन्हात त्याने ‘तेजाब’मधील मुन्नासारखी एन्ट्री घेतली. ‘एक... दोन...तीन...’ गाण्यावर त्याने ठेका धरला, ‘झकास’चा डायलॉग मारत पुन्हा एकदा त्याने ‘राम-लखन’च्या तालावर नेहमीची ‘स्टाईल’ मारली आणि उपस्थित हजारो रसिकांनी त्याला डोक्यावर घेतलं.
ट्रॅफिक जॅम, नागरिक इमारतींवरही उभे, मोबाईलवर फोटो काढण्यासाठी उंचावलेले हजारो हात असं चित्र कोल्हापूरच्या व्हीनस कॉर्नरने यावेळी अनुभवलं. ख्यातनाम अभिनेते अनिल कपूर हे तब्बल ४० वर्षांनंतर ‘मलाबार गोल्ड’ शोरूमच्या उद्घाटनासाठी रविवारी कोल्हापुरात आले होते. कºहाड येथे विमानतळावर उतरून दुपारी १२ च्या सुमारास व्हीनस कॉनर्रवर आले. उपस्थितांना अभिवादन करून त्यांनी या शोरूमचे उद्घाटन केले.
त्यानंतर पुन्हा बाहेर आल्यानंतर अनिल कपूर यांच्या दिलखुलासपणाची प्रचिती उपस्थित रसिकांना आली. पांढरा शर्ट, त्यावर काळे जाकीट, गॉगल घातलेले अनिल कपूर स्टेजवर आले आणि टाळ्या-शिट्ट्यांचा पाऊस सुरू झाला. त्यांची नृत्य अदा कॅमेºयात कैद करण्यासाठी हजारो मोबाईल खिशातून बाहेर आले. ‘कोल्हापूरला आल्यामुळे मला जोश आला’ असे सांगत अनिल कपूर यांनी रसिकांशी संवाद साधायला सुरुवात केली. कोल्हापूरची ही माती तुम्हाला जीवनात घडवते, असे सांगून आपल्या कोल्हापूरच्या वास्तव्याचीही त्यांनी आठवण सांगितली. आपल्या ‘टपोरी स्टाईल’च्या डायलॉगमधून तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, मी द्यायलाच बसलोय, असे सांगत स्वत: ‘एक... दोन... तीन...’ गाणे म्हणायला सुरुवात केली.
यावेळी ‘मलाबारा’च्या अधिकाºयांसमवेत त्यांनी उपस्थित गर्दीचाही सेल्फी घेतला. यावेळी खासगी सुरक्षा व्यवस्था आणि पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
............................
१९७७ मधील कोल्हापूरची आठवण
सन १९७७ मध्ये आपण कोल्हापूरमध्ये ‘फुल खिले है गुलशन गुलशन’ या मालिकेच्या चित्रीकरणासाठी आला होतो. हॉटेल टुरिस्ट येथे राहिलो होतो. त्यानंतर ३९ वर्षांनंतर पुन्हा कोल्हापूरला येण्याचा योग आला, असे अनिल कपूर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कोल्हापुरात काढलेले फोटो माझे फोटो दाखवून मी उमेदवारीच्या काळात कामाच्या शोधात होतो, असेही त्यांनी सांगितले.
...........................
‘उमर का राज’ कोल्हापुरी मटण
साठी उलटलेल्या अनिल कपूरचे तब्येतीचे रहस्य विचारल्यानंतर मात्र क्षणात अनिल कपूर यांनी ‘कोल्हापुरी मटण’ असे उत्तर दिले. ‘रेस ३’, ‘एक लडकी को देखा तो....’ अशा आपल्या आगामी चित्रपटांबाबतही त्यांनी यावेळी माहिती दिली. सलमान खानबाबत विचारल्यानंतर ‘तो माझा चांगला मित्र आहे. तो सदा खूश राहावा’ एवढीच प्रतिक्रिया त्यांनी दिली.
..........................
‘राजकारण, नको रे बाबा’
‘नायक’ चित्रपटाबाबत विचारल्यानंतर उत्साही झालेल्या अनिल कपूर यांनी या चित्रपटाबाबत आपल्या आठवणी सांगितल्या. ‘शिवाजीराव गायकवाड’ असा उल्लेख करत खूप चांगला चित्रपट मला मिळाला. अनेक मुख्यमंत्र्यांनीही हा चित्रपट आवडला आणि त्यातून काही प्रेरणा घेतल्याचेही आपल्याला सांगितल्याचे अनिल कपूर यांनी यावेळी नमूद केले. अनेक कलाकार आपला पक्ष काढत आहेत, राजकारणात प्रवेश करणार का, असे विचारल्यानंतर मात्र त्यांनी ‘राजकारण, नको रे बाबा’ अशी भूमिका मांडली.